अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष, गंभीर अनियमितता व गैरवर्तनाचे आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवेदन चोपडा प्रतिनिधी (संपादक...
अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष, गंभीर अनियमितता व गैरवर्तनाचे आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवेदन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यात नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उत्खननाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करत चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्या संपत्तीची ईडी, आयकर विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यकाळात अवैध वाळू व गौण खनिज प्रकरणांमध्ये संशयास्पद दुर्लक्ष, विविध गंभीर अनियमितता, कर्तव्यातील कसूर, नागरिकांशी गैरवर्तन, शासकीय कामकाजातील दिरंगाई तसेच पत्रकारांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या अनेक तक्रारी संबंधित प्रशासकीय कार्यालयांकडे करण्यात आल्या आहेत. उपलब्ध तक्रारी, वृत्तपत्रांतील बातम्या, शासकीय नोटिसा आणि इतर कागदपत्रांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी ३ जून रोजी पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याच संदर्भात लेखी निवेदन दिले होते. ते निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्वीकारले होते. मात्र, त्यानंतरही तहसीलदार, संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने दि. २९ जून रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर विराट जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या निवेदनावर माजी आमदार कैलास पाटील, नरेंद्र पाटील (भाजपा), संजय सोनवणे (काँग्रेस), बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस–अजित पवार), देवेंद्र सोनवणे (शिवसेना–उबाठा), अनिल वानखेडे (मनसे), डॉ. चंद्रकांत बारेला (राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार), नारायण पाटील, सौ. सोनाली पाटील, शशिकांत देवरे, शशिकांत पाटील, विलास पाटील, नंदलाल मराठे आदींसह अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन सादर करताना डॉ. चंद्रकांत बारेला, शशिकांत देवरे, नंदलाल मराठे, विलास पाटील, अमोल राजपूत आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी, "तहसीलदारांच्या निलंबनाचा निर्णय माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाही. मात्र, प्राप्त निवेदनाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल," असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

No comments