फैजपूरात पाणीपुरवठ्यावर राजकीय हस्तक्षेप ? अखेर तो राजकीय पुढारी कोण ! आठ दिवसांपासून पाणी बंद… कुरेशी मोहल्यातील नागरिक त्रस्त पुरवठा न ...
फैजपूरात पाणीपुरवठ्यावर राजकीय हस्तक्षेप ? अखेर तो राजकीय पुढारी कोण !
आठ दिवसांपासून पाणी बंद… कुरेशी मोहल्यातील नागरिक त्रस्त पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर : शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात मागील आठ दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून संतप्त महिला व नागरिकांनी आज फैजपूर नगरपरिषदेत निवेदन सादर केले. यावेळी नगर परिषदेत चौकशी केली असता “एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून या भागाचा पाणीपुरवठा करणारा वाल्व बंद करण्यात आला आहे” अशी धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण परिसरात एकच प्रश्न चर्चिला जात आहे अखेर तो राजकीय पुढारी कोण?
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कुरेशी मोहल्ला परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे अनियमित झाला आहे. अनेक वेळा ठरलेल्या वेळेत पाणी येत नाही, तर काही वेळा पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाणी ही जीवनावश्यक गरज असून पाण्याअभावी घरगुती कामे, स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून नियमित व वेळेवर पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
आज मोठ्या संख्येने महिला व काही पुरुष नागरिक नगर परिषद कार्यालयात पोहोचले होते. संबंधित विभागाकडून वाल्व बंद करण्यात आला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला. नागरिकांचे म्हणणे आहे की, जर राजकीय दबावातून जनतेच्या मूलभूत हक्कांशी खेळ केला जात असेल, तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
सध्या संबंधित “राजकीय पुढारी” कोण आहे, याबाबत नगर परिषद प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे फैजपूर शहरातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
निवेदन देताना कुरेशी मोहल्ल्यातील नागरिक साईम कुरेशी, इरफान कसाब, रफीक कुरेशी, मुस्तकीम खान, रहीमुद्दीन भाई, मुस्तकीम कुरेशी, आमीन कुरेशी तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते.

No comments