अहिल्यानगरमध्ये खळबळ! लग्नाचा नकार ठरला कारण; तरुणीला पळवले,माहिती देण्याच्या नावाखाली हताश बापाची 30 हजारांची लूट ! सचिन मोकळं अहिल्यान...
अहिल्यानगरमध्ये खळबळ! लग्नाचा नकार ठरला कारण; तरुणीला पळवले,माहिती देण्याच्या नावाखाली हताश बापाची 30 हजारांची लूट !
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- पाथर्डी तालुक्यातील एका गावातून १८ वर्ष ८ महिने वयाच्या एका महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,मुलगा अल्पवयीन असल्याने मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला होता,याच रागातून हे कृत्य करण्यात आले.या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात मुख्य संशयित आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या आणि पैशांची मागणी करणाऱ्या इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाथर्डी पोलिसांनी या गुन्ह्याप्रकरणी तन्मय जनार्धन ढाकणे (वय १९,रा.काटेवाडी) मुख्य संशयित आरोपी,जनार्धन काशिनाथ ढाकणे (रा. काटेवाडी),प्रशांत मुरलीधर सारुख (रा.जिरेवाडी, ह.मु. आळंदी,पुणे),रविंद्र पोपट घुले (रा.काटेवाडी,पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तन्मय ढाकणे याच्या लग्नासाठी त्याच्या वडिलांनी मुलीच्या घरी मागणी घातली होती.मात्र,तन्मय हा कायद्यानुसार लग्नासाठी अल्पवयीन (१९ वर्षे) असल्याने मुलीच्या सुशिक्षित वडिलांनी या बेकायदेशीर लग्नास स्पष्ट नकार दिला होता.याचाच राग मनात धरून तन्मयने मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर ८ मे २०२६ रोजी सकाळी ही महाविद्यालयीन तरुणी अचानक घरातून बेपत्ता झाली.सुरुवातीला कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला,मात्र ती न सापडल्याने पाथर्डी पोलिस ठाण्यात ती हरवल्याची नोंद करण्यात आली होती.शोध सुरू असतानाच,धमकी देणारा संशयित आरोपी तन्मयही घरातून पसार झाल्याचे समोर आले.मुलगी बेपत्ता असल्याने तिचे कुटुंब प्रचंड चिंतेत होते. याच हताशतेचा फायदा आरोपी रविंद्र पोपट घुले याने घेतला.त्याने "मी तुमच्या मुलीची माहिती देतो" असे सांगून मुलीच्या हतबल वडिलांकडून फोन पे (PhonePe) द्वारे ३० हजार रुपये उकळले.मात्र,पैसे घेऊनही त्याने कोणतीही माहिती न देता वडिलांची क्रूर फसवणूक केली.संशय बळावल्याने मुलीच्या वडिलांनी स्वतःआरोपी जनार्धन ढाकणे, प्रशांत सारुख आणि रविंद्र घुले यांचा माग काढण्यास सुरुवात केली.तपासादरम्यान हे तिघे नाशिक येथे गेल्याची माहिती मिळाली.वडिलांनी थेट नाशिक गाठले असता,तिथे धक्कादायक प्रकार समोर आला.हे तिघे जण मुख्य आरोपी तन्मय ढाकणे याला लपून भेटले होते आणि त्यांनी त्याला खाण्यापिण्याचे साहित्य व पैशांची मोठी मदत केली होती.मुलीच्या वडिलांनी नाशिकमध्ये आरोपींना गाठून जाब विचारला असता, आरोपींनी अत्यंत उद्धटपणे सांगितले की,"मुलगी तन्मयसोबतच आहे.तन्मयचे लग्नाचे कायदेशीर वय (२१ वर्षे) झाल्यावर आम्ही त्यांचे लग्न लावून देऊ!" इतकेच नव्हे तर आरोपींनी मुलीच्या वडिलांना भररस्त्यात शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकीही दिली.आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले असून,इतर आरोपी त्याला मदत करत असल्याचे आणि पैशांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली.पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी चौघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

No comments