चोपडा तालुक्यात हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई; ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : राज्य उत...
चोपडा तालुक्यात हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई; ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० मे ते १ जून या कालावधीत चोपडा तालुक्यातील खऱ्यापाडा, कोळंबा व सुटकार परिसरात हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून रु. ३ लाख ८५ हजार ३४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत निरीक्षक अ. कै. सु. मोमीन (चोपडा), निरीक्षक भरारी पथक अशोक तारू, दुय्यम निरीक्षक भरारी पथक योगेश सूर्यवंशी तसेच दुय्यम निरीक्षक निकिता खपके यांनी सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून २४५ लिटर गावठी दारू तसेच १०,०५० लिटर रसायन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रु. ३,८५,३४० इतकी आहे.
या मोहिमेत दुय्यम निरीक्षक नरेंद्र पाटील तसेच जवान नितीन पाटील, भूषण परदेशी, गोकुळ अहिरे, पूनम पाटील, नंदू पवार, राहुल सोनवणे आणि विठ्ठल हाटकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
अवैध मद्यनिर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाया सुरू असून, भविष्यातही अशा प्रकारच्या धडक मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

No comments