स्क्रॅप भंगार व्यवहारातील वादातून एका नामांकित व्यावसायिकाचे अपहरण करून तब्बल साडेचार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा अहिल्यानगर जिल्ह्यात ...
स्क्रॅप भंगार व्यवहारातील वादातून एका नामांकित व्यावसायिकाचे अपहरण करून तब्बल साडेचार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघडकीस तिघांवर गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- व्यापारी जगताला हादरवून सोडणारी एक अत्यंत खळबळजनक घटना अहिल्यानगरमध्ये समोर आली आहे.स्क्रॅप मालाच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारातून एका व्यावसायिकाला चक्क त्याच्या घराबाहेरून उचलण्यात आले. आरोपींनी केवळ अपहरणच केले नाही,तर पुण्यातील आळंदी येथील एका बंद फ्लॅटमध्ये डांबून ठेवून व्यावसायिकाला बेदम मारहाण केली आणि साडेचार कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.पैसे दिले नाही तर संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू', अशी थेट धमकी दिल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी रमेश बोगा (वय ३९,रा.श्रावस्ती बंगला,विद्या कॉलनी, आदर्शनगर,नेप्ती सबरबंद,नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी तात्काळ पावले उचलत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित व्यावसायिकाच्या तक्रारीवरून,राजबीर गजराजसिंग मल्होत्रा (रा.मौर्य पार्क,वाडेबोल्हाई,वाघोली,पुणे),जुगन राजबीर मल्होत्रा (रा.मौर्य पार्क,वाडेबोल्हाई,वाघोली,पुणे),शिवाजी चंद्रकांत थोरवे (रा. आळंदी,पुणे), या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश बोगा आणि आरोपींमध्ये स्क्रॅप मालाच्या व्यवहारावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता.दि.२९ मे २०२६ रोजी पहाटे १ च्या सुमारास बोगा हे आपल्या घराबाहेर असताना, दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना गाठले.स्क्रॅपचा व्यवहार न केल्याच्या रागातून आरोपींनी त्यांना जबरदस्तीने एका वाहनात कोंबले आणि पळवून नेले.
अपहरण केल्यानंतर आरोपींनी आधी बोगा यांचे दोन महागडे मोबाईल फोन आणि खिशातील ३ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली, जेणेकरून ते कोणाशीही संपर्क साधू शकणार नाहीत.
आरोपींनी रमेश बोगा यांना थेट पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका फ्लॅटमध्ये आणले.तिथे त्यांना डांबून ठेवून बेदम मारहाण करण्यात आली. "तुझ्यामुळे आमचे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे,ते पैसे आताच्या आता भरून दे, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी आरोपींनी दिली.
काहीही करून सुटका करून घेतल्यानंतर व्यावसायिकाने थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शनिवारी रात्रीच गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments