adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा-वरला रस्त्याची दुरवस्था; टू-लेन रस्ता व जीर्ण एसटी बसेस बदलण्याची जनसंघर्ष समितीची मागणी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे चोपडा तहसीलदार आणि डेपो व्यवस्थापकांना निवेदन सादर

 चोपडा-वरला रस्त्याची दुरवस्था; टू-लेन रस्ता व जीर्ण एसटी बसेस बदलण्याची जनसंघर्ष समितीची मागणी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे चोपडा तहस...

 चोपडा-वरला रस्त्याची दुरवस्था; टू-लेन रस्ता व जीर्ण एसटी बसेस बदलण्याची जनसंघर्ष समितीची मागणी

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे चोपडा तहसीलदार आणि डेपो व्यवस्थापकांना निवेदन सादर  


वरला/बलवाडी | शेख अय्यूब

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा-वरला मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था तसेच वरला-बलवाडी मार्गावर धावणाऱ्या जीर्ण एसटी बसेसमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जन संघर्ष समिती वरला व ग्रामपंचायत वरला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चोपडा तहसीलदार तसेच चोपडा आगार व्यवस्थापक यांना राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करून विविध मागण्या केल्या.

निवेदनात चोपडा ते वरला हा सुमारे ३२ किलोमीटरचा रस्ता तातडीने टू-लेन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून हा मार्ग सिंगल असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

याशिवाय वरला-बलवाडी मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने त्या तातडीने बदलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच सकाळी ९ वाजताची बंद करण्यात आलेली बससेवा पूर्ववत सुरू करावी आणि या मार्गावरील बसफेऱ्यांची संख्या वाढवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

जन संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पांडे यांनी सांगितले की, चोपडा-वरला हा मार्ग महाराष्ट्राला मध्यप्रदेशातील इंदूर शहराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हा रस्ता टू-लेन झाल्यास चोपडा-जळगाव- छ. संभाजीनगर मार्गे इंदूरपर्यंतचे अंतर सुमारे २५ किलोमीटरने कमी होऊ शकते. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल.

सध्या अनेक वाहने शिरपूरमार्गे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात. बिजासन परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. चांगला रस्ता उपलब्ध झाल्यास या समस्येवर मोठ्या प्रमाणात उपाय होईल. तसेच आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिक, मजूर आणि विद्यार्थी यांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी तहसीलदार आणि डेपो व्यवस्थापक यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित निवेदन तातडीने वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री तसेच लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यात येईल व समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळात वरलाचे सरपंच शांतिलाल आर्य, मेदलियापानीचे सरपंच गुच्छा जमरा, प्रदीप चौरसिया, रूपेश जैन, किशोर राठोड, हरचंद अप्पा, वासुदेव अण्णा यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. निवेदनाचे वाचन जन संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पांडे यांनी केले.

No comments