आंतरराष्ट्रीय नशामुक्ती दिनानिमित्त एस्प्लनेड कनिष्ठ महाविद्यालयाची भव्य जनजागृती प्रभात फेरी उत्साहात संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- ...
आंतरराष्ट्रीय नशामुक्ती दिनानिमित्त एस्प्लनेड कनिष्ठ महाविद्यालयाची भव्य जनजागृती प्रभात फेरी उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कांदिवली (पश्चिम) येथील एस्प्लनेड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय नशामुक्ती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत भव्य जनजागृती प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. युवकांमध्ये व्यसनमुक्तीची जाणीव निर्माण करून सुदृढ, सशक्त आणि संस्कारित समाज घडविण्याचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शांतिलाल मोदी रोड, एस. व्ही. रोड, एम. जी. रोड तसेच महाविद्यालय परिसरातून काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत सुमारे २१० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकही या जनजागृती मोहिमेत सहभागी झाले. या प्रभात फेरीचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रभावी पथनाट्ये. रॅली ज्या-ज्या चौकातून व मार्गांवरून गेली, त्या प्रत्येक प्रमुख ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यसनांचे दुष्परिणाम आणि नशामुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारी पथनाट्ये सादर करून समाजप्रबोधन केले. याशिवाय ग्रामीण भागातील पारंपरिक दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना नशेच्या विळख्यातून दूर राहण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील सादरीकरणाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक मा. धवलभाई वोरा, वॉर्ड क्रमांक २२ चे नगरसेवक श्री. हिमांशूभाई पारेख, तसेच चारकोप विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. योगेशभाई सागर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि नशामुक्त समाज निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्रभात फेरीचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. जयेशभाई मजेठिया तसेच निरंजना मजेठिया डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या सौ. रेश्मा वझा यांची प्रेरणादायी उपस्थिती. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी कार्य करण्याचा संदेश दिला.
या जनजागृती उपक्रमामध्ये कांदिवली पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक मा. श्री. विजयकुमार बडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच व्यसनांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले. संपूर्ण प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कांदिवली पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, त्यामुळे हा उपक्रम शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमात एस्प्लनेड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक वाणी, विज्ञान विभागाच्या समन्वयक सौ. शांती कन्नन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी "मी कोणत्याही प्रकारच्या नशायुक्त पदार्थांचे सेवन करणार नाही आणि नशामुक्त समाज घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन," अशी सामूहिक शपथ घेतली. तसेच हा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत, मित्रपरिवारापर्यंत आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला बळकटी देणारी ही प्रभात फेरी समाजमनात नशामुक्तीचा विचार दृढ करणारी ठरली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि विविध जनजागृती उपक्रमांतून व्यसनमुक्त, निरोगी आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीचा प्रभावी संदेश सर्वदूर पोहोचला.

No comments