नवापूर शहरात बनावट तेलाचा काळाबाजार उघड मात्र मानवी शरीरास अपायकारक प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री. अन्न व औषध प्रशासनाची ध...
नवापूर शहरात बनावट तेलाचा काळाबाजार उघड मात्र मानवी शरीरास अपायकारक प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री.
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; तब्बल १२४१ किलो संशयित सोयाबीन-शेंगदाणा तेल जप्त
नवापूर | प्रतिनिधी पंकज आहिरे.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नवापूर शहरातील लाईट बाजार परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाड टाकत तब्बल १२४१ किलो संशयित रिफाईंड सोयाबीन व शेंगदाणा तेलाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे तेल विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूरातील एका ऑईल मिलवर अचानक तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात विनापरवाना व नियमबाह्य पद्धतीने तेल साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. या तेलावर कोणतेही अधिकृत ब्रँडिंग, पॅकेजिंग, उत्पादनाचे नाव किंवा बॅच क्रमांक नव्हता. त्यामुळे संबंधित तेलाच्या गुणवत्तेबाबत गंभीर संशय निर्माण झाला.
या कारवाईत अंदाजे २ लाख रुपये किमतीचे तेल जप्त करण्यात आले असून संपूर्ण साठा प्रशासनाने तातडीने सील केला आहे. तपासणीसाठी तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ही मोहीम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि नाशिक विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या पथकात सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, संकेत सदाफुले आणि सुरेंद्र डोले यांनी सहभाग घेतला.
“जनतेच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने अवैध तेलावर तर कारवाई केली परंतु राज्यात प्रतिबंधित असलेले विमल, पानमसाले,
मानवी शरीराला घातक तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री नवापूरसह ग्रामीण भागात सुरू असून त्यांचेवर कधी कारवाई होईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय.तसेच शाळा,काॅलेज परीसर,चौकाचौकातील दुकानांमध्ये अल्पवयीन मुलांनाही असे तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा नागरीकांचा आरोप आहे.विशेष म्हणजे बनावट तेलामुळे आरोग्य धोक्यात येते,त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार वाढत असल्याचे आरोग्य तज्ञ वारंवार सांगत आहेत.तरी
अन्न व औषध प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याशी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करत विमल माफीया व तेल माफीया यांची वेळीच नांगी ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाने आता प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबविण्याची मागणी नवापूर शहरासह तालुक्यात जोर धरू लागली आहे.
━━━━━━━━━━━━━━━


No comments