चोपडा शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेची धडक मोहीम सुमारे ५०० अतिक्रमणे हटवली; नागरिकांकडून समाधान, प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत चोपड...
चोपडा शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेची धडक मोहीम
सुमारे ५०० अतिक्रमणे हटवली; नागरिकांकडून समाधान, प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत
चोपडा | प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषदेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करत बुधवारी व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. विशेष म्हणजे या मोहिमेपूर्वी सलग तीन ते चार दिवस रिक्षाद्वारे शहरभर जनजागृती व आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक नागरिक व व्यावसायिकांनी अतिक्रमण हटाव पथक येण्यापूर्वीच स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढून घेतल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
मोहीमेची सुरुवात संविधान चौक येथून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटील दरवाजा, आठवडे बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसर, भाजीपाला मार्केट, आझाद चौक, बोहरा गल्ली, मुख्य बाजारपेठ, चावडी तसेच गोल मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान रस्त्यांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या, ओटे व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. एकूण सुमारे ५०० लहान-मोठी अतिक्रमणे काढून शहरातील रस्ते मोकळे करण्यात आले.
काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असला तरी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत संबंधितांना समजावून सांगितले. काही व्यावसायिकांनी आपले साहित्य हलविण्यासाठी दोन ते तीन तासांची मुदत मागितली. त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारत आवश्यक वेळ दिला.
नगरपरिषद प्रशासनाने भाजीपाला, चिकन-मटन व मासे विक्रेत्यांना वारंवार सूचना देत त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांवरच व्यवसाय करण्याचे आवाहन केले आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी भाजी मंडईत, चिकन-मटन विक्रेत्यांनी मटन मार्केटमध्ये तर मासे विक्रेत्यांनी नगरपरिषदेकडून निश्चित केलेल्या जागेवर व्यवसाय करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
मोहीम पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते अधिक मोकळे व प्रशस्त झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी "रस्त्यांनी पुन्हा श्वास घेतला" अशा शब्दांत समाधान व्यक्त करत नगरपरिषदेच्या कारवाईचे स्वागत केले. शहरातील विविध भागांतील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून इतर गल्ली-बोळांमधील अतिक्रमणेही टप्प्याटप्प्याने हटविण्याची मागणी केली.
मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
यावेळी मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले की, "चोपडा शहर अधिक सुंदर, स्वच्छ, सुटसुटीत व वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावे, ही नगरपरिषदेची भूमिका आहे. रस्ते व गटारींवरील अतिक्रमणे केवळ वाहतुकीस अडथळा निर्माण करत नाहीत, तर घाण साचून आरोग्याच्या समस्यांनाही कारणीभूत ठरतात. त्यामुळे सर्व अतिक्रमणधारकांनी कोणतीही कारवाई होण्याची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून नगरपरिषदेला सहकार्य करावे."
नागरिक व व्यावसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद
अनेक वर्षांपासून रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषदेने धाडसी व लोकहिताचा निर्णय घेत कारवाई केल्याने शहरातील रस्ते मोकळे झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच काही व्यावसायिकांनीही प्रशासनाने समजूतदारपणे वागून साहित्य हलविण्यास वेळ दिल्यामुळे अनावश्यक नुकसान टळल्याचे सांगितले.
लोकप्रतिनिधींचे सहकार्य
या मोहिमेदरम्यान शहरातील लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता शहरहिताला प्राधान्य दिल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनाने त्यांचे आभार मानले.
अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचे मोलाचे योगदान
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकासह RCP पोलीस पथकाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
चोपडा नगरपरिषदेच्या या व्यापक कारवाईमुळे शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच सातत्यपूर्ण मोहिमांद्वारे चोपडा शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रशासनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments