फैजपूरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेची धडपड; ७ एअर व्हॉल्व्ह बदलले कमी दाब व गळतीच्या समस्येवर उपाययोजना; वीजपुरवठा खंडित असतानाही ...
फैजपूरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेची धडपड; ७ एअर व्हॉल्व्ह बदलले
कमी दाब व गळतीच्या समस्येवर उपाययोजना; वीजपुरवठा खंडित असतानाही रात्रभर काम
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वादळी वाऱ्यामुळे लोहारा येथील पंपिंग केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने फैजपूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर फैजपूर नगरपालिकेने तातडीने पुढाकार घेत पाणीपुरवठा यंत्रणेतील महत्त्वाचे असलेले सात एअर व्हॉल्व्ह बदलण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले.
नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फैजपूर-खिरोदा मार्गावरील बंद व गळतीग्रस्त एअर व्हॉल्व्हची पाहणी करून नवीन व्हॉल्व्ह बसविण्याची मोहीम हाती घेतली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कामात सातही एअर व्हॉल्व्ह यशस्वीपणे बदलण्यात आले.
लोहारा जॅकवेलवरील वीजपुरवठा खंडित असल्याने पाणीपुरवठा तात्पुरता बंद होता. या काळातच यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भविष्यातील गळती कमी होण्यास मदत होणार असून पाईपलाईनमधील पाण्याचा दाबही सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या कामादरम्यान उपनगराध्यक्षा निकिता कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू कोळी, नगरसेवक सूरज गाजरे, सागर होले, पवन सराफ, राहुल गुजराथी व युनूस मोमीन यांनी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. तसेच पालिकेचे कर्मचारी नदीम खान, अमोल सराफ, किशोर वडर, अमोल जावळे, जयेश सोनार, तुषार पाटील आणि चंदू कुऱ्हाडे यांनी रात्रभर परिश्रम घेत काम पूर्ण केले.
उर्वरित व्हॉल्व्हही बदलणार
पालिकेकडून आता खिरोदा ते लोहारा मार्गावरील बंद अवस्थेतील उर्वरित एअर व्हॉल्व्ह बदलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपाययोजनेमुळे पाईपलाईनमधील अडकलेली हवा बाहेर पडण्यास मदत होऊन पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत व वेगवान होणार आहे. परिणामी शहरातील नागरिकांना अधिक प्रभावी, नियमित आणि कमी अडचणींचा पाणीपुरवठा उपलब्ध होईल, अशी माहिती नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी दिली.

No comments