हेमकांत गायकवाड यांची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी नियुक्ती चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पत्रकार...
हेमकांत गायकवाड यांची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी नियुक्ती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) या संघटनेने चोपडा तालुक्यातील युवा पत्रकार, संपादक व सामाजिक कार्यकर्ते हेमकांत बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार हेमकांत गायकवाड यांची राज्य सदस्यपदी निवड करण्यात आली असून संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत पत्रकारांच्या समस्या, हक्क व कल्याणासाठी कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे तसेच इतर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेत सदस्य म्हणून नोंदणी पूर्ण केल्यानंतर हेमकांत गायकवाड यांना अधिकृत सदस्यत्व प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो, नाव आणि "महाराष्ट्र राज्य सदस्य" हे पदनाम नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीपत्रात पत्रकारिता क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संघटनेची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकार बांधवांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून भक्कमपणे काम करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
हेमकांत गायकवाड यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांना संघटनात्मक स्तरावर अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकारांच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार
हेमकांत गायकवाड (महाराष्ट्र राज्य सदस्य, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन) यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, "संघटनेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करणार आहे."

No comments