विवाहितेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या आधारे खंडणी उकळणारा आरोपी अटक इदू पिंजारी फैजपूर (संपादक : हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील एका ३...
विवाहितेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या आधारे खंडणी उकळणारा आरोपी अटक
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील एका ३२ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख सोशल मीडियावरील डेटिंग अॅपच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील तुषार सिद्धार्थ तायडे (रा. गौतम नगर, सुंदरखेड, जि. बुलढाणा) याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. दरम्यान, जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत आरोपीने महिलेला फैजपूर, भुसावळ, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, फर्दापूर तसेच बुलढाणा येथील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याच काळात आरोपीने महिलेच्या नकळत अश्लील व्हिडिओचे चित्रीकरणही केले. त्यानंतर संबंधित व्हिडिओ महिलेच्या पतीला व नातेवाईकांना दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीपोटी पीडित महिलेने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून आरोपीला सुमारे ७४ हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तुषार तायडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखींचा गैरफायदा घेऊन महिलांची फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. फैजपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
No comments