अंबाजोगाईतील रुग्णालयात रुग्णांचे हाल, बेडअभावी रुग्ण फरशीवर, तर दुसरीकडे कर्मचारीवर्गाचा अवाढव्य फुगवटा! - मोहंमद ताहेर अंबाजोगाई प्रतिन...
अंबाजोगाईतील रुग्णालयात रुग्णांचे हाल, बेडअभावी रुग्ण फरशीवर, तर दुसरीकडे कर्मचारीवर्गाचा अवाढव्य फुगवटा! - मोहंमद ताहेर
अंबाजोगाई प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
येथील स्वाराती (स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) रुग्णालयातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे रुग्णालयात रुग्णांसाठी साधे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना थेट जमिनीवर किंवा वार्डातील फरशीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत, तर दुसरीकडे येथे कार्यरत असलेल्या बीव्हीजी (BVG) आणि एम.एस.एफ. (MSF) कर्मचारी वर्गाची संख्या गरजेपेक्षा जास्त असल्याची चर्चा आहे. या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतून उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांची स्वारातीवर मोठी मदार असते. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यावर रुग्णांना बेड मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागते. बेड उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत अनेकांना रात्रभर जमिनीवर किंवा फरशीवर पडून राहावे लागत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती असून, रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कर्मचारी वर्गाचा फुगवटा, रुग्णसेवेचे काय?
रुग्णालयात बीव्हीजी आणि एम.एस.एफ. अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या ही आवश्यकतेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त केलेले असतानाही प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांची मदत रुग्णांना मिळत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर इतकी मोठी मनुष्यबळाची फौज रुग्णालयात तैनात असेल, तर रुग्णांना बेड मिळवण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी का धडपडावे लागत आहे, याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
स्वाराती रुग्णालय हे अंबाजोगाईसह परिसरातील रुग्णांसाठी जीवनदायिनी मानले जाते. मात्र, वाढत्या गैरसोयी आणि नियोजनाचा अभाव यामुळे या रुग्णालयाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रुग्णालयातील बेडची संख्या वाढवावी आणि अवाढव्य कर्मचारी वर्गाचे योग्य ऑडिट करून रुग्णसेवेत सुधारणा करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

No comments