स्मार्ट मीटर : आधुनिकतेचा मार्ग की ग्राहकांवर सक्तीचा भार? महावितरणच्या स्मार्ट मीटर मोहिमेबाबत राज्यभरात प्रश्नचिन्ह; ग्राहकांमध्ये वाढता...
स्मार्ट मीटर : आधुनिकतेचा मार्ग की ग्राहकांवर सक्तीचा भार?
महावितरणच्या स्मार्ट मीटर मोहिमेबाबत राज्यभरात प्रश्नचिन्ह; ग्राहकांमध्ये वाढता संभ्रम
राज्यात सध्या स्मार्ट मीटरचा विषय चांगलाच चर्चेत आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांच्या घरी पारंपरिक मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेमुळे ग्राहकांमध्ये अनेक शंका आणि संभ्रम निर्माण होत असून, काही ठिकाणी नाराजीचे स्वरही उमटू लागले आहेत.
अनेक ग्राहकांना मोबाईल संदेशाद्वारे अल्प कालावधीत मीटर बदलण्यात येणार असल्याची सूचना दिली जात आहे. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती, मार्गदर्शन किंवा ग्राहकांच्या शंकांचे समाधान होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. "स्मार्ट मीटर नेमके काय आहे?", "त्याचा बिलांवर काय परिणाम होईल?", "मीटर बदलणे बंधनकारक आहे का?" अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचलेली दिसत नाहीत.
महावितरणच्या मते स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक माहिती मिळेल, चोरीला आळा बसेल तसेच वीज व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. ग्राहकांना रिअल-टाईम वीज वापराची माहिती उपलब्ध होऊन ऊर्जा बचतीस मदत होईल, असेही सांगितले जात आहे. मात्र देशातील काही भागांत स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढीव वीजबिले, तांत्रिक अडचणी आणि चुकीच्या रीडिंगच्या तक्रारी समोर आल्याने नागरिकांच्या मनातील शंका अधिकच वाढल्या आहेत.
स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीपूर्वी ग्राहकांना विश्वासात घेणे, व्यापक जनजागृती करणे आणि सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती देणे आवश्यक होते, असे मत अनेक ग्राहक व्यक्त करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात या योजनेबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर सक्तीचे नसल्याची चर्चा विविध स्तरांवर होत आहे. काही राजकीय नेत्यांनी देखील याबाबत सक्ती नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जर स्मार्ट मीटर ऐच्छिक असतील, तर ग्राहकांना याबाबत स्पष्ट पर्याय का दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वीज ग्राहक हा केवळ महसूल भरणारा घटक नसून संपूर्ण वीज व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कोणतीही नवीन योजना राबविताना पारदर्शकता, लोकसहभाग आणि विश्वास या तत्त्वांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मनातील शंका दूर करणे, त्यांना वस्तुस्थितीची माहिती देणे आणि कोणताही गैरसमज राहणार नाही याची काळजी घेणे ही महावितरणची जबाबदारी आहे.
स्मार्ट मीटर ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची संकल्पना असली तरी तिची अंमलबजावणी लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे. अन्यथा आधुनिकतेच्या नावाखाली ग्राहकांवर निर्णय लादले जात असल्याची भावना निर्माण होऊन विरोधाची तीव्रता वाढू शकते.
आता महावितरणने अधिकृतपणे स्पष्ट भूमिका मांडून स्मार्ट मीटरबाबतचे सर्व गैरसमज दूर करावेत आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, अशी मागणी विविध स्तरांतून जोर धरत आहे.
संकलन : शामसुंदर सोनवणे
नेशन महाराष्ट्र व्यवस्थापकीय संपादक मो.8208449983

No comments