स्वाभिमानीचे वडजी उपकेंद्रावर टेंभा आंदोलन, महावितरणला १५ दिवसांचा अल्टिमेटम अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : व...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : वडजी, हरणखेड, आळंद आणि माळेगाव परिसरातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी वडजी वीज उपकेंद्रावर (सबस्टेशन) आक्रमक टेंभा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत लेखी आश्वासन द्यावे लागले.
परिसरातील सुमारे २०० ते ३०० शेतकरी कुटुंबे शेतात वास्तव्यास असून सध्या महावितरणच्या वेळापत्रकानुसार रात्री १० वाजता सिंगल फेज वीजपुरवठा सुरू केला जातो. त्यामुळे शेतकरी व ग्रामीण नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. शेतातील दैनंदिन कामे, पाणीपुरवठा तसेच घरगुती गरजा लक्षात घेता सिंगल फेज वीजपुरवठा सायंकाळी ६ वाजताच सुरू करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांनी केली.
मागणीची दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वडजी उपकेंद्रावर टेंभा आंदोलन छेडले. हे आंदोलन तब्बल तीन ते चार तास सुरू होते. परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन व महावितरणचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. यानंतर झालेल्या चर्चेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसांत सिंगल फेज वीजपुरवठा रात्री १० ऐवजी सायंकाळी ६ वाजता सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी इशारा देताना सांगितले की, "महावितरणने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही तर यापेक्षाही तीव्र व व्यापक आंदोलन उभारण्यात येईल. शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना अंधारात ठेवण्याचा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही."
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष गोपाल सातव, वडजी शाखाध्यक्ष पराग बोंडे, हरणखेड शाखाध्यक्ष विश्वनाथ होले, प्रशांत राजपूत, अनंता खडसे, अनंता भारंबे, गजानन बोंडे, हरणखेडचे माजी सरपंच ज्ञानदेव खाचणे, वैभव करांडे, प्रकाश नारखेडे, संदीप खाचणे, ओंकार राणे, जगदीश फिरके, राहुल इंगळे, नितीन खाचणे, हर्षल नारखेडे, अरुण चोपडे, गणेश गायकवाड, सुनील सुपे, तेजस वासतकार, संजय तायडे, शरद इंगळे, अक्षय पाटील, कुंदन पाटील, पिंटू भारंबे, प्रमोद बराटे, पृथ्वीराज राजपूत, निलेश नाफडे, नितीन राजपूत, निलेश दांडगे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

No comments