मराठीला ‘अभिजात’ दर्जा; मात्र शाळांच्या विकासासाठी निधी रखडला, शिवसेनेचा सरकारवर निशाणा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
मराठीला ‘अभिजात’ दर्जा; मात्र शाळांच्या विकासासाठी निधी रखडला, शिवसेनेचा सरकारवर निशाणा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा गाजावाजा होत असताना दुसरीकडे मराठी शाळांच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी अद्यापही न मिळाल्याने मलकापूरातील मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नगर विकास विभागाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २३ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ सुरू केले होते. या अभियानांतर्गत मलकापूर नगरपरिषदेला १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीपैकी ५० टक्के रक्कम मराठी शाळांच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक होते.
मात्र शासन निर्णय जाहीर होऊन पाच महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही प्रत्यक्ष निधी उपलब्ध झालेला नसल्याने नगरपरिषदेच्या मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच ‘शिक्षक सरप्लस’ असल्याचे कारण देत काही शिक्षकांची संख्या कमी करण्यात आल्याने शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश इतरत्र घेतल्याने नगरपरिषदेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या अवघ्या १५ वर येऊन ठेपल्याचा दावा करण्यात आला आहे.
दिपक चांभारे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा गौरव केला जात आहे, तर दुसरीकडे मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला निधी रखडवला जात आहे. याउलट ‘नमो उद्यान’ योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मलकापूर नगरपरिषदेसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणात मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा, अभियानाचा निधी त्वरित उपलब्ध करून मराठी शाळांची दुरवस्था थांबवावी तसेच कमी करण्यात आलेले शिक्षक पुन्हा नियुक्त करावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
अन्यथा नगरपरिषदेवर धडक देत ‘शिवसेना स्टाईल’ तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिपक चांभारे पाटील यांनी दिला.
यावेळी पांडुरंग चिम, राजेंद्र काजळे, अक्षय रायपुरे, गणेश सुशीर, अर्जुन कुयटे, संतोष भगत, असीम खान, शेख फिरोज शेख फरीद यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिक्रिया
“केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी राज्यातील मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे शासनाची दुटप्पी भूमिका जनतेसमोर आली आहे.”
– दिपक चांभारे पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख, मलकापूर

No comments