adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खरीप हंगाम तोंडावर; बोगस बियाण्यांच्या जाळ्यापासून सावध राहा! फिरत्या विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका; अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा – स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांचे आवाहन

 खरीप हंगाम तोंडावर; बोगस बियाण्यांच्या जाळ्यापासून सावध राहा! फिरत्या विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका; अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी ...

 खरीप हंगाम तोंडावर; बोगस बियाण्यांच्या जाळ्यापासून सावध राहा!

फिरत्या विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका; अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा – स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांचे आवाहन 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर :  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाण्यांच्या विक्रीचे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करून आवश्यक कागदपत्रे जतन करावीत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी केले आहे.

             मान्सूनपूर्व तयारीला वेग आला असून जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व नियोजनात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत बोगस बियाणे विक्री करणारे काही दलाल आणि व्यापारी सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत निलेश नारखेडे यांनी शेतकऱ्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, बोगस बियाण्यांचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेवर होतो. पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता कमी असल्याचे लक्षात येते, मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया गेलेले असतात. त्यामुळे बियाणे खरेदी करताना कोणतीही घाई न करता अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

               बियाण्याच्या पॅकेटवरील उत्पादन करणाऱ्या कंपनीचे नाव, बॅच क्रमांक, उगवण क्षमता, उत्पादन दिनांक व मुदत समाप्ती दिनांक यांची खात्री करून घ्यावी. तसेच खरेदी केल्यानंतर पक्के बिल घेऊन ते जतन करून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात एखादी तक्रार किंवा नुकसान भरपाईचा प्रश्न निर्माण झाल्यास ही कागदपत्रे महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. फिरत्या विक्रेत्यांच्या भूलथापांना किंवा कमी दराच्या आमिषाला बळी पडून अनधिकृत ठिकाणाहून बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकते, असा इशाराही नारखेडे यांनी दिला. शेतकऱ्यांनी सावध राहून गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निवड करणे हीच भविष्यातील उत्पादनाची पहिली हमी असल्याचे त्यांनी सांगितले.

                दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने बाजारपेठांमध्ये नियमित तपासणी मोहीम राबवून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. संशयास्पद बियाणे विक्रीबाबत माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभाग अथवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच सावधगिरी बाळगल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका टाळता येईल आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी भक्कम पायाभरणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments