शहरातील भटक्या श्वानांचा (कुत्र्यांचा) वाढता उपद्रव; ABC सेंटर सुरू करण्याची नगरसेविका कल्पना वाणी यांची मागणी भरत कोळी यावल : (संपादक ...
शहरातील भटक्या श्वानांचा (कुत्र्यांचा) वाढता उपद्रव; ABC सेंटर सुरू करण्याची नगरसेविका कल्पना वाणी यांची मागणी
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरात भटक्या श्वानांची (कुत्र्यांची) दिवसेंदिवस वाढणारी संख्या नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनली असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका कल्पना दिलीप वाणी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना लेखी निवेदन सादर करून शहरात अॅनिमल बर्थ कंट्रोल (ABC) सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच विविध वस्ती भागांमध्ये भटक्या श्वानांचे कळप मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहरात श्वानदंश (कुत्रा चावण्याच्या) घटनांमध्ये वाढ होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ABC सेंटर सुरू करून भटक्या श्वानांची नसबंदी (Sterilization), रेबीज प्रतिबंधक लसीकरण (Anti-Rabies Vaccination) तसेच शासनाच्या नियमांनुसार त्यांचे व्यवस्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होईल, असे नगरसेविका कल्पना वाणी यांनी नमूद केले आहे. तसेच या गंभीर समस्येवर नगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments