पोदार प्रेप, अकलूद येथे 'योग इन मड' उत्साहात संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अकलूद : आंतरराष्ट्रीय मड डे निमित्त...
पोदार प्रेप, अकलूद येथे 'योग इन मड' उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अकलूद : आंतरराष्ट्रीय मड डे निमित्त पोदार प्रेप, भुसावळ येथे विद्यार्थी व पालकांसाठी 'योग इन मड' या अनोख्या आणि आनंददायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. निसर्गाच्या सान्निध्यात, मातीशी मैत्री करत आणि योगाचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी व पालकांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना निसर्गाशी जोडणे, संवेदनात्मक अनुभव देणे, सर्जनशीलतेला चालना देणे तसेच सूक्ष्म व स्थूल स्नायूंचा विकास घडवून आणणे हा होता. मातीमध्ये खेळत, धावत, उड्या मारत आणि योगासनांचा सराव करत मुलांनी आनंददायी शिक्षणाचा अनुभव घेतला. या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, कल्पनाशक्ती, शारीरिक समन्वय आणि पर्यावरणाविषयी जिव्हाळा निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमामध्ये मडि बडीज योगा, मड पेंटिंग्ज, मास्टरपीस, मड बेकरी, मडी फिट योगा, मुद्राज विथ मडी हॅण्डस, मड ओब्स्टाकल कोर्स, फुटबॉल इन मड आणि स्ट्रेच अँड प्ले योगा अशा विविध आकर्षक व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी मातीपासून सुंदर कलाकृती तयार केल्या, विविध योगासने केली आणि खेळत-खेळत शिकण्याचा आनंद अनुभवला.
या उपक्रमात पालकांनीही मुलांसोबत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवत त्यांनी या अभिनव संकल्पनेचे मनापासून कौतुक केले. आनंद, उत्साह, हास्य आणि निसर्गाशी जोडलेले क्षण यामुळे हा कार्यक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
शाळेचे प्राचार्य मा. श्री. सचिन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोदार प्रेपमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण व अनुभवाधारित उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून 'योग इन मड' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. मनीषा शृंगी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
"खेळत शिकणे, निसर्गाशी नाते जोडणे आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे" हा उपक्रमाचा मूलभूत उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments