फैजपूरच्या जि.प. उर्दू कन्या शाळा क्र. २ ची दुरावस्था; शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ? इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ग...
फैजपूरच्या जि.प. उर्दू कन्या शाळा क्र. २ ची दुरावस्था; शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ?
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर : येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्र. २ ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी केला आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यावल तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने वारंवार प्रस्ताव व निवेदने सादर करण्यात आली. त्यानुसार दि. २२ सप्टेंबर २०२२, दि. १९ ऑगस्ट २०२३ दि. १९ डिसेंबर २०२४ २१ ऑगस्ट आणि १७ जून २०२६ रोजी दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र, अद्यापही शाळेच्या दुरुस्तीबाबत कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. सध्या पावसाळ्यात शाळेच्या इमारतीची अवस्था अधिकच बिकट होत असून, वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने विद्यार्थिनींना बसण्यासाठीही पुरेशी जागा राहत नाही. त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत असून विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संबंधित शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून काम सुरू करावे, अशी मागणी पालक व शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.

No comments