adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकरी संकटात; स्वराज्य पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकरी संकटात; स्वराज्य पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेम...

बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकरी संकटात; स्वराज्य पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चालू खरीप हंगामात पेरणीसाठी वापरण्यात आलेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे तेल्हारा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीनंतर अपेक्षित अंकुरण न झाल्याने पेरणीचा खर्च वाया गेला असून दुबार पेरणीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणी स्वराज्य पक्षाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक खर्च करून बियाण्यांची खरेदी व पेरणी केली; मात्र अनेक ठिकाणी बियाण्यांचे अंकुरणच झाले नाही. त्यामुळे मशागत, पेरणी व इतर शेतीवरील खर्च वाया गेला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे दुबार पेरणीचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर पडला आहे. तसेच, निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात कसे उपलब्ध झाले, याची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या शेतांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई, प्रति एकर आर्थिक मदत तसेच दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांचा पुरवठा करण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य पक्षाने केली आहे. पुढील तीन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कुलूप ठोक आंदोलन करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी स्वराज्य पक्षाचे शुभम इसापुरे, सचिन जुंबळे, शेख जाबीर, कुलदीप बाजारे, करण भारसाकडे, श्रीकृष्ण डोंगरे, शिवदास भारसाकडे, सुनील धरमकर, प्रशांत काळपांडे, राजू सोळंके, श्रीकृष्ण डांगे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

No comments