अंतुर्ली येथील तापीमाई दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना बोनस, भेटवस्तू व बिनव्याजी आर्थिक मदतीची घोषणा अंतुर्ली, ता. ...
अंतुर्ली येथील तापीमाई दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना बोनस, भेटवस्तू व बिनव्याजी आर्थिक मदतीची घोषणा
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर | प्रतिनिधी : किरण धायले
(संपादक हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली येथील तापीमाई दूध उत्पादक शेतकरी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न दिनेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना अध्यक्ष दिनेश पाटील यांनी सांगितले की, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल २ कोटी ८७ लाख रुपये इतकी झाली असून संस्थेला १ लाख ८७ हजार २८३ रुपये निव्वळ नफा झाला आहे. या नफ्यातून नियमित दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना ३५ हजार ७०५ रुपयांचा बोनस तसेच २६ हजार ५०० रुपयांच्या भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
याशिवाय संस्थेचे नियमित दूध उत्पादक सभासदांना दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने म्हैस खरेदीसाठी म्हशीच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम बिनव्याजी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. संस्थेचे "विकास" ब्रँडचे दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणारे ग्राहक तसेच घरगुती दूध ग्राहकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेनंतर जिल्हा सहकारी बोर्ड, जळगाव यांच्या वतीने संस्थेच्या सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सहकारी बोर्डाचे जगदीश पवार यांनी सहकार चळवळ, संस्थेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसायातील संधी याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक एस. ए. भोईसर, संचालक व मार्गदर्शक शरद महाजन, भाऊराव महाजन, डिगंबर महाजन, गोविंद महाजन, विशाल पाटील, अरविंद पाटील, विलास पाटील, सचिव शिवाजी पाटील, विलास नाना पाटील, संदीप ठोंबरे, अनिल वाडीले, शांताराम महाजन, नरेश पाटील, धनराज चौधरी, गंगाराम शिरतुरे, बबन पाटील, रामभाऊ पाटील, व्ही. आर. महाजन, रमेश महाजन, भास्कर सोनवणे, अशोक पाटील, दिवाकर पाटील, शांताराम दुट्टे, राजेश सोनार, संस्थेचे व्यवस्थापक नथू तायडे, सेल्समन संजय बोरसे, नितीन शिरतुरे तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वार्षिक अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक नथू तायडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचालक भाऊराव महाजन यांनी मानले.

No comments