काँग्रेस आणि रा. काँ. (शप) तर्फे शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान... पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा गांधींगिरी करत निषेध... विकास पाटील ध...
काँग्रेस आणि रा. काँ. (शप) तर्फे शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान...
पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा गांधींगिरी करत निषेध...
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:-:हेमकांत गायकवाड)
धरणगाव -- येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा गांधींगिरी पद्धतीने निषेध नोंदवत शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. निषेध आंदोलनप्रसंगी झालेल्या जोरदार घोषणाबाजीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा परिसर दणाणून निघाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच चाळीसगाव येथे झालेल्या वीज वितरण कंपनीच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर ते सहन करतील." आधीच वीज वितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पद्धतशीरपणे डोळेझाक करतात आणि त्यातच पालकमंत्री असे बोलत असतील तर याचा नक्कीच नकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मंत्री महोदयांनी शेतकरी विरोधी केलेल्या असंवेदनशील तसेच बेताल वक्तव्याचे राज्यभर पळसाद उमटत असतांना आज धरणगावात देखील तीव्र संतापाची लहर बघायला मिळाली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धरणगाव तालुका व शहर यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ या वक्तव्याचा निषेध म्हणून उपस्थित शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी छापलेल्या बॅनरवर असलेल्य टॅगलाईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, "उद्योजकांना देऊ नका त्रास, शेतकऱ्यांना मिळणार हमखास" याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ व्ही डी पाटील म्हणाले की, पालकमंत्री पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य केल्यामुळे वीज वितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेणार नाहीत त्याकडे दुर्लक्ष करतील. एवढंच नव्हे या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदवत डॉ पाटील यांनी युती सरकारवर ताशेरे ओढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, भाऊ निवडणुकीच्या तोंडावर तुम्हांला शेतकरी आठवतो मग इतर वेळी नेमकं शेतकऱ्यांबद्दल एवढी अनास्था का? स्वतःला सालदार म्हणवून घेणारे पालकमंत्री कधीपासून मालदार लोकांची एवढी बाजू घ्यायला लागले असेही श्री पाटील म्हणाले. शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना त्रास होतो हे जाहीरपणे गुलाबराव पाटील यांनी मान्य केले अगदी तसंच शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नये. काँग्रेसचे सुनिल सोनार यांनी सांगितले की, आम्ही लोकशाही मार्गाने आणि गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या वतीने निषेध नोंदवला. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते सलीम बेलदार, दिनेश पाटील, ओबीसी सेल प्रदेश सचिव रामचंद्र माळी, ताराचंद महाराज, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष भूषण भागवत, योगेश येवले NSUI चे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, बाळू पाटील, दुर्गेश पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते नारायण चौधरी, तालुका कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन शहर कार्याध्यक्ष रविंद्र वाघ, सचिव नंदू धनगर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष खलील खान, मीडिया प्रमुख रविंद्र महाजन युवक कार्याध्यक्ष सागर महाले, उपाध्यक्ष समाधान महाजन, साहिल खान, नूर जमाल, दिनकर पाटील यांच्यासह शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. निषेध आंदोलनप्रसंगी झालेल्या जोरदार घोषणाबाजीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा परिसर दणाणून निघाला.

No comments