महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्रामगौरव फाउं...
महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रामगौरव फाउंडेशन या राज्यस्तरीय संस्थेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांची कार्यतत्परता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामविकास परिषद ही राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. परिषदेचे संस्थापक प्रणेते विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक सचिव सुभाष मराठे यांनी भाग्यश्री ठाकरे यांच्या ग्रामीण विकास क्षेत्रातील अभ्यास, कार्याची आवड आणि संघटन कौशल्याचा गौरव करत त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. या पदाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींशी संबंधित धोरणात्मक विषयांवर समन्वय साधणे, तसेच सर्व घटकांच्या अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न व रास्त मागण्यांसाठी संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाग्यश्री ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व ग्रामविकास क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments