चोपडा-शिरपूर बायपास रस्त्याची दुरवस्था; पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा श...
चोपडा-शिरपूर बायपास रस्त्याची दुरवस्था; पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहराबाहेरील धरणगाव–चोपडा–शिरपूर बायपास रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, विशेषतः पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वीच हा बायपास रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. पुलावरील खराब झालेल्या रस्त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या धोकादायक परिस्थितीची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन पुलावरील व रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments