महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून फुलणार 'सुबोनियो' पक्षी घर; मराठी प्रतिष्ठानचा २०० बोगनवेलींचा उपक्रम यशस्वी जळगाव | प्रतिनिधी ...
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून फुलणार 'सुबोनियो' पक्षी घर; मराठी प्रतिष्ठानचा २०० बोगनवेलींचा उपक्रम यशस्वी
जळगाव | प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
"सुंदर जळगाव – हिरवेगार जळगाव" या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मराठी प्रतिष्ठान, जळगाव व सुबोनियो परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरून तलाव परिसरातील सुबोनियो पक्षी घर येथे २०० बोगनवेलींचे वृक्षारोपण उत्साहात पार पडले. परिसर अधिक सुशोभित, रंगीबेरंगी आणि पक्ष्यांसाठी अनुकूल करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मराठी प्रतिष्ठानने काही दिवसांपूर्वी "बोगनवेल वृक्षदान" उपक्रमाचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अवघ्या काही दिवसांत २०० बोगनवेली वृक्षदान स्वरूपात उपलब्ध झाल्या. विशेष म्हणजे या सर्व वृक्षांचे दान शिक्षकी क्षेत्रातील महिला प्राध्यापकांनी केले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. पर्यावरण संवर्धनासाठी महिलांनी घेतलेला हा पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
वृक्षदान करणाऱ्यांमध्ये माजी प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी १००, प्रा. पुनम मानधने यांनी ५०, प्रा. सविता नंदनवार यांनी २९, प्रा. डॉ. विजेता सिंग यांनी १०, प्रा. डॉ. रत्नप्रभा महाजन यांनी ७, तर प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी ४ बोगनवेलींचे वृक्षदान करून पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोगनवेलींचे वृक्षारोपण करण्यात आले. "झाडे लावा... झाडे जगवा..." हा संदेश देत लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. भविष्यात सुबोनियो पक्षी घर परिसर बोगनवेलींच्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून पक्ष्यांसाठी अधिक आकर्षक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी मराठी प्रतिष्ठानतर्फे सर्व वृक्षदात्या महिला प्राध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या विश्वस्त प्रा. सविता नंदनवार यांनी सुबोनियो पक्षी घर परिसरात आजवर झालेल्या वृक्षलागवडीची, त्यांच्या संगोपनाची तसेच परिसर अधिक हिरवागार व पक्षीमित्र बनविण्याच्या नियोजनाची माहिती दिली. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास महानगरपालिका पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, वसंत पाटील, "माझे शहर माझी जबाबदारी" अभियानाचे संयोजक सुहास दुसाने, उद्योजक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सौ. हिरा चौधरी, सौ. सारिका चौधरी, डॉ. सृष्टी चौधरी, सुमोल चौधरी, हर्ष चौधरी, सौ. संजना चौधरी, राजेश चौधरी, लीना चौधरी, अर्चना नेमाडे पाटील, उडान संस्थेच्या अध्यक्षा सौ. हर्षाली चौधरी, सौ. निलोफर जमील देशपांडे, रूबीना अल्ताफ देशपांडे, उद्धव महाजन, दीपक धांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. "झाडे लावणे ही केवळ सुरुवात आहे; ती जगवणे हीच खरी जबाबदारी आहे. मराठी प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणासोबत त्यांचे संगोपन करण्याचे कार्य सातत्याने करत असून, जळगाव शहर अधिक हिरवेगार व पर्यावरणपूरक करण्यासाठी भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येतील," असे त्यांनी सांगितले. तसेच वृक्षदान करणाऱ्या सर्व महिला प्राध्यापकांचे, उपस्थित मान्यवरांचे आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
मराठी प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे सुबोनियो पक्षी घर परिसराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार असून, "सुंदर जळगाव – हिरवेगार जळगाव" ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments