विरवाडे येथे प्रतिबंधित गुटखा विक्रीवर अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई; १ हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त चोपडा प्रतिनिधी (स...
विरवाडे येथे प्रतिबंधित गुटखा विक्रीवर अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई; १ हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न सुरक्षा विभाग आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १ हजार ८ रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास विरवाडे येथील भोलेनाथ पान सेंटर येथे छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व 'टी-१' सुगंधित तंबाखू विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी प्रवीण प्रल्हाद पाटील (वय ५५, रा. विरवाडे, ता. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २९३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित तरतुदींसह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान विमल पान मसाल्याचे ६० पाऊच (प्रति पाऊच ८ रुपये), ६ पाऊच (प्रति पाऊच ४८ रुपये), ६ पाऊच (प्रति पाऊच १८ रुपये) तसेच 'टी-१' सुगंधित तंबाखूची ३ पाकिटे असा एकूण १,००८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक, पवनकुमार देसले, तपास अधिकारी राजेंद्र कोळी तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. प्रशांत वाडिले करीत आहेत.
शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

No comments