चोपडा शहरात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री; एकाविरुद्ध गुन्हा दाखल चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहर पो...
चोपडा शहरात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहर पोलिसांनी प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
दि. १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.०० वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील भाजी मंडई परिसरातील फ्रूट सप्लायर्स दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी फिरोज हुसेन बागवान (वय ३९, रा. प्लॉट गल्ली, आझाद चौक, चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी, जळगाव येथील आकाश कैलास चौधरी (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हा शासनाने प्रतिबंधित केलेल्या मानवी आरोग्यास अपायकारक पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी विमल, कमरचंद, तानसेन आदी विविध ब्रँडचे प्रतिबंधित पान मसाल्याचे अनुक्रमे २८, ३०, ५२, ११०, २० व ४७ पाऊच तसेच 'टी-१' सुगंधित तंबाखूची १८ पाकिटे असा प्रतिबंधित माल जप्त केला.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल (पो.कॉ.) प्रशांत वाडिले करीत असून, तपास अधिकारी चेतन परदेशी आहेत.

No comments