जे. टी. महाजन पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
जे. टी. महाजन पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे दि. २८ जुलै २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील प्रथम वर्षाच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पाटील उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा संयमित व सुरक्षित वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. सोशल मीडियाचे फायदे-तोटे, सायबर सुरक्षितता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर कसा करावा याबाबत त्यांनी विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. पी. एम. राणे यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करून तंत्रनिकेतनाची शैक्षणिक परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, नियमित उपस्थिती, अभ्यासाचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रनिकेतनातील विविध सुविधा याविषयी मार्गदर्शन केले.यानंतर इलेक्ट्रिकल तंत्रनिकेतन विभागाचे विभागप्रमुख प्रा. जयंत बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना K-Scheme अभ्यासक्रम, प्रयोगशाळा, प्रात्यक्षिके, अंतर्गत मूल्यमापन, परीक्षा पद्धती तसेच विभागातील विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
शिष्यवृत्ती व जात वैधता (Caste Validity) संदर्भात सचिन बारी सर यांनी विद्यार्थी व पालकांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, जात वैधता प्रमाणपत्राचे महत्त्व तसेच सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले.
मेकॅनिकल तंत्रनिकेतन विभागाचे विभागप्रमुख प्रा. ए. एस. कोळी यांनी तंत्रनिकेतनातील प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रक्रियेची माहिती देत विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांसमोर मांडली. तसेच तंत्रनिकेतनामार्फत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या प्लेसमेंटच्या संधी, उद्योगांशी असलेले सहकार्य आणि आगामी काळात सुमारे १५ नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देऊन पालकांचा विश्वास अधिक दृढ केला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. रूपाली चौधरी मॅडम व प्रा. यशस्वीता गाजरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रूपाली चौधरी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच तंत्रनिकेतनातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. नव्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात या इंडक्शन कार्यक्रमातून झाली असून कार्यक्रम आनंदी, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

No comments