श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी सामान्य रुग्णालयात अन्नदान करून आठवडाभराच्या धार्मिक सोहळ्याची सा...
श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सामान्य रुग्णालयात अन्नदान करून आठवडाभराच्या धार्मिक सोहळ्याची सांगता
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव : स्थानिक सतीफैल परिसरातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची सांगता सामान्य रुग्णालयात रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह गरजूंना अन्नदान (महाप्रसाद) वाटप करून करण्यात आली.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २६ वर्षांपासून गुरुपौर्णिमा उत्सव सातत्याने साजरा केला जात आहे. "मुखी रामनाम, हाती रामसेवा" हे ब्रीद जोपासत मंडळ विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.
यावर्षी दि. २२ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या स्व. प्रमिलाबाई देशमुख यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी हरिपाठ, तर रात्री सद्गुरू स्तोत्र पारायण, नामस्मरण, जपमाळ आणि भजन असे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. श्रीमती सुशिलाबाई आवलकर यांनी व्यासपीठावरून ज्ञानेश्वरी पारायणाचे मार्गदर्शन केले.
दि. २९ जुलै रोजी सद्गुरू स्तोत्र पारायण, नामस्मरण, महाआरती व भजनाचा कार्यक्रम झाला. तर दि. ३० जुलै रोजी सकाळी खामगाव सामान्य रुग्णालयात रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह गरजूंना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आरती व प्रसाद वितरण करून गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश माने, सेवानिवृत्त पीएसआय शेषराव अभोरे, समाजसेवक नरेंद्र मावळे, रवि तिवारी, सुभाष शेळके, महेंद्र पाठक, कल्याण गलांडे, गोविंद कडवकर, लॉयन्स क्लब अध्यक्ष किशोर गरड यांच्यासह मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने वर्षभर अन्नदान, गरजूंना ब्लँकेट वाटप, दिवाळीत मिठाई व नमकीन वितरण, वृक्षारोपण, रक्तदान यांसारखे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.


No comments