आषाढी एकादशीनिमित्त जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल, दि. २४ ज...
आषाढी एकादशीनिमित्त जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल, दि. २४ जुलै २०२६ : व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव आदी संतांची आकर्षक वेशभूषा साकारून वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका रंजना महाजन व दीपाली धांडे यांच्या हस्ते पालखीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर शाळेच्या परिसरातून गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. टाळ, मृदुंग आणि झांज यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी अभंग व गवळणी सादर करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला. तसेच "झाडे लावा, झाडे जगवा", "स्वच्छ परिसर, सुंदर परिसर" आणि "बेटी बचाओ, बेटी पढाओ" असे सामाजिक संदेश देत जनजागृतीही केली.
या दिंडी सोहळ्यामुळे गावात भक्तिमय व आनंददायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका गौरी भिरूड, राजश्री लोखंडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

No comments