शिक्षण क्षेत्रातील कथित घोटाळ्यांवर तुकाराम मुंडे यांच्या धर्तीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी; अनिल वाडीले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...
शिक्षण क्षेत्रातील कथित घोटाळ्यांवर तुकाराम मुंडे यांच्या धर्तीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी; अनिल वाडीले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुंबई/जळगाव : राज्यातील शिक्षण क्षेत्रात कथितपणे सुरू असलेल्या विविध गैरप्रकार, बोगस शिक्षक भरती, शालार्थ आयडी घोटाळा, पोषण आहार, अनुदान वितरण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर आणि प्रामाणिक प्रशासनाची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (VJNT विभाग) चे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून कार्यरत असताना तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात प्रभावी कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ रोखण्याचे उल्लेखनीय काम केले. त्याच धर्तीवर शिक्षण विभागातही निर्भीड आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
वाडीले यांनी निवेदनात आरोप केला आहे की, राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती, बनावट शालार्थ आयडी, शालेय पोषण आहार, अनुदान वितरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याशिवाय HSC, SSC, MPSC, TET आणि NEET परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या या प्रकरणांमध्ये विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी सुरू असून अनेक गुन्हे दाखल झाले असले, तरी संबंधित संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांवर कठोर प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सन २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असतानाही काही संस्थांनी लाखो रुपये घेऊन भरती केली. तसेच प्रत्यक्ष सेवेत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन काढून शासनाच्या तिजोरीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी संस्थाचालक व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, त्यांना सेवेतून बडतर्फ करावे तसेच शासनाच्या निधीची झालेली हानी त्यांच्या मालमत्तेतून वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या शिक्षण संस्थांमध्ये गैरव्यवहार सिद्ध झाले आहेत, त्या संस्था शासनाने ताब्यात घेऊन शासनामार्फत चालवाव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, पात्र उमेदवार आणि फसवणूक झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीसारखे निर्भीड अधिकारी शिक्षण विभागात नियुक्त करावेत, अशी मागणी अनिल वाडीले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

No comments