चोपडा शहरात मोकाट गुरांचा वाढता उपद्रव; कोंडवाड्याअभावी नगरपालिकेपुढे प्रश्न कायम चोपडा ता. प्रतिनिधी : अशोक कोळी / चंद्रकांत पाटील विचखेडा ...
चोपडा शहरात मोकाट गुरांचा वाढता उपद्रव; कोंडवाड्याअभावी नगरपालिकेपुढे प्रश्न कायम
चोपडा ता. प्रतिनिधी : अशोक कोळी / चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना शहराच्या प्रवेशद्वारापासूनच वाहतूक कोंडी व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी मोकाट गुरे मुक्तपणे वावरत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात खासगी मालकीच्या जनावरांव्यतिरिक्त गुरुकुल परिसरालगत राहणाऱ्या काठेवाडी बांधवांच्या गीर जातीच्या गायी व वासरेही मोठ्या प्रमाणावर मोकाट फिरताना दिसतात. अनेक नागरिक या जनावरांना शिळे अथवा उरलेले अन्न देत असल्याने ही गुरे चौकाचौकात आणि रस्त्याच्या मध्यभागी तासन्तास बसून रवंथ करताना दिसतात. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी मोकाट गुरे पकडण्याची कारवाई केली जात असली, तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र कोंडवाड्याची व्यवस्था नसल्याने ही कारवाई प्रभावी ठरत नाही. कायमस्वरूपी कोंडवाडा उभारल्यास जनावरांच्या मालकांकडून नियमानुसार दंड व शुल्क वसूल करून नगरपालिकेला महसूलही मिळू शकतो. मात्र कोंडवाड्याच्या अभावामुळे मोकाट गुरांचा प्रश्न कायम राहिला असून प्रशासनालाही त्यावर ठोस तोडगा काढणे कठीण जात आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि मोकाट गुरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने कोंडवाडा उभारून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments