शासकीय कामात हस्तक्षेप, जीवे मारण्याची धमकी; सराईत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची नागरिकांची मागणी शासकीय मोजणीवेळी अडथळा; जातीवाचक शिवीगाळ केल्...
शासकीय कामात हस्तक्षेप, जीवे मारण्याची धमकी; सराईत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
शासकीय मोजणीवेळी अडथळा; जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रोसिटीसह गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जामखेड :- उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी, कर्जत यांच्या आदेशानुसार अण्णाभाऊ साठेनगर, नान्नज येथे भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू असलेल्या सार्वजनिक जागेच्या शासकीय मोजणीदरम्यान अडथळा निर्माण करून मातंग समाजातील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका सराईत आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा (ॲट्रोसिटी) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेस नोटनुसार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सार्वजनिक मांग चावडीसंदर्भातील जागेची शासकीय मोजणी सुरू असताना महेंद्र अभिमान मोहळकर हा घटनास्थळी येऊन शासकीय कामकाजात बेकायदेशीर हस्तक्षेप करत मोजणीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने अण्णाभाऊ साठेनगर येथील मातंग समाजातील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत जामखेड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. गावात बेकायदेशीर धंदे, दहशत निर्माण करणे, गोरगरीब व दुर्बल घटकांवर दबाव टाकणे, शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणे आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी कृत्ये करण्याचे आरोपही नागरिकांनी केले आहेत.
नागरिकांनी असा दावाही केला आहे की, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीच्या एका प्रकरणात मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, श्रीगोंदा यांनी अटक वॉरंट जारी केले होते. तरीदेखील त्याने शासकीय मोजणीच्या ठिकाणी येऊन पुन्हा शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्याच्याविरुद्ध यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई किंवा तडीपारीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
अण्णाभाऊ साठेनगर येथील मातंग समाजातील नागरिकांनी संबंधित आरोपीला तातडीने अटक करून त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात तसेच तडीपारीची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शासकीय कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अण्णाभाऊ साठेनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाणे करीत आहे. नागरिकांनी कायद्यावर विश्वास ठेवून शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments