अंतुर्ली–चोपडा बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी अंतुर्ली : किरण धायले (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अंतुर्ली व परिसरातील नागरिक, विद्यार्...
अंतुर्ली : किरण धायले
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी अंतुर्ली–चोपडा बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (VJNT विभाग) चे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांच्या नेतृत्वाखाली रावेर आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अंतुर्ली परिसरातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य सेवा, व्यापार, शेतीसाठी लागणारे खत व बियाणे खरेदी तसेच रेल्वे प्रवासासाठी रावेर, सावदा, फैजपूर, यावल आणि चोपडा येथे नियमित जावे लागते. याशिवाय शिरपूर, शहादा आदी भागात नातेवाईक असल्याने अनेक नागरिकांचा या मार्गावर सातत्याने प्रवास असतो. मात्र, थेट बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, अंतुर्ली येथून सकाळी ६ वाजता बेलसावाडी, पिंपरीनांदू, पाटोंडी, रावेर, सावदा, फैजपूर, किनगाव व यावल मार्गे चोपडाकडे बस सुरू करण्यात यावी. तसेच चोपडा येथून सायंकाळी ५ वाजता सुटणारी बस किनगाव, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, पातोंडी, पिंपरीनांदू, बेलसावाडी आणि बेलखेड फाटा मार्गे रात्री अंतुर्ली मुक्कामी सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनासोबत अंतुर्ली ग्रामपंचायतीचे प्रशासक, बेलसावाडी, धामंदे, बेलखेड व भोकरी समूह ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीयुक्त समर्थनपत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (VJNT विभाग) चे प्रदेश सचिव अनिल वाडीले, शेख भैय्या शे. करीम, किरण धायले आणि युवराज भिल्ल यांनी लवकरात लवकर अंतुर्ली–चोपडा बस सेवा पूर्ववत सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली. परिसरातील नागरिकांकडूनही ही बस सेवा तातडीने सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments