adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कृष्णा राठोडची महाराष्ट्र संघात निवड; राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत खेळणारा पहिला खेळाडू

  राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कृष्णा राठोडची महाराष्ट्र संघात निवड;  राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत खेळणारा पहिला खेळाडू रावेर  मुबारक तडवी  (संपादक...

 राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कृष्णा राठोडची महाराष्ट्र संघात निवड; राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत खेळणारा पहिला खेळाडू


रावेर  मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर येथील श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथील गुणवंत हॉकीपटू कृष्णा विठ्ठल राठोड याची हॉकी महाराष्ट्रच्या अंडर-19 संघात निवड झाली असून तो 16 व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा दि. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत कोयंबतूर, तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणारा रावेर परिसरातील पहिला खेळाडू म्हणून कृष्णा विठ्ठल राठोड याची गणना होत असून, ही संपूर्ण रावेर परिसरासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब ठरली आहे. आपल्या सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याने राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळविले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या परंपरेत आणखी एका सुवर्णपानाची भर पडली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालय, रावेर शहर तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून, कृष्णा राठोडच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हेमंतदादा नाईक, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. डी. धापसे, नॅक समन्वयक डॉ. बी. जी. मुख्यदल, क्रीडा संचालक डॉ. उमेश नारायण पाटील, क्रीडा समिती सदस्य प्रा. चतुर गाडे, प्रा. लालचंद वळवी, तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृष्णा राठोड याचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडा संचालक डॉ. उमेश नारायण पाटील यांनी सांगितले की, "महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा, नियमित प्रशिक्षण आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून आमचे विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. कृष्णा राठोडची राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे, तर संपूर्ण रावेर परिसरासाठी गौरवाची बाब आहे. 

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रावेर परिसरातून खेळणारा पहिला खेळाडू म्हणून त्याने इतिहास घडविला असून, तो महाराष्ट्र संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करेल, असा आम्हाला विश्वास आहे."

विशेष आकर्षण म्हणजे, 16 व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील सामने 'डीडी स्पोर्ट्स (DD Sports)' वाहिनीवर थेट (Live) प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे रावेर परिसरातील क्रीडाप्रेमींना आपल्या परिसरातील पहिल्या राष्ट्रीय हॉकीपटू कृष्णा विठ्ठल राठोडचा खेळ घरबसल्या थेट पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

कृष्णा राठोडच्या या ऐतिहासिक यशामुळे श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात आणखी भर पडली असून, त्याच्या या यशामुळे परिसरातील अनेक युवकांना हॉकी खेळाची प्रेरणा मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तो उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र आणि रावेर परिसराचे नाव देशभरात उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments