पावसाच्या पुनरागमनाने खरीप पिकांना जीवदान; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चोपडा तालुक्यात पावसाची हजेरी; शेतकऱ्या...
पावसाच्या पुनरागमनाने खरीप पिकांना जीवदान; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चोपडा तालुक्यात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यात खरीप हंगामातील पिकांना यंदा पावसाच्या दीर्घ खंडाचा फटका बसला होता. सलग बारा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मंगळवार, दि. 21 जुलै रोजी दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात यंदा मका, कापूस, तूर, ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची तसेच पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला होता.
दरम्यान, पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बुधवारी, दि. 22 जुलै रोजी सकाळपासूनही रिमझिम पाऊस सुरू असल्याने वातावरण ढगाळ राहिले. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, आगामी काळातही समाधानकारक पाऊस पडल्यास यंदाचा हंगाम चांगला होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

No comments