रोटरीतील समानतेची भावना हीच खरी ताकद; समाजसेवेचा आदर्श कायम ठेवा – प्रा. अरुणभाई गुजराथी चोपड्यात रोटरी क्लबचा ५६ वा पदग्रहण सोहळा उत्साहा...
रोटरीतील समानतेची भावना हीच खरी ताकद; समाजसेवेचा आदर्श कायम ठेवा – प्रा. अरुणभाई गुजराथी
चोपड्यात रोटरी क्लबचा ५६ वा पदग्रहण सोहळा उत्साहात; इंटरॅक्ट क्लबची स्थापना, गरजू विद्यार्थिनींना पुस्तकांचे वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, जात, पंथ, वर्ण किंवा सामाजिक दर्जा असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेच्या धाग्यात बांधून मैत्री, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी रोटरी ही जागतिक चळवळ आहे. हीच रोटरीची खरी "ब्युटी" असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले.
चोपडा येथील धनवाडी रोडवरील लक्ष्मी नारायण लॉन्स येथे रविवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या ५६ व्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल रोटे. राजीव शर्मा, सहप्रांतपाल रोटे. हरविंदरसिंग थेथी, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे नूतन अध्यक्ष रोटे. संजय बारी, मानद सचिव लीना पाटील, कोषाध्यक्ष गौरव महाले, सहसचिव चंद्रशेखर साखरे, उपप्रांतपाल ॲड. रुपेश पाटील, अतिरिक्त जिल्हा सचिव नितीन अहिरराव, जिल्हा सहसचिव आशिष जयस्वाल तसेच अमळनेर एन्कलेव्ह चेअर विलास एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्यात मावळते अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी नूतन अध्यक्ष संजय बारी यांना अध्यक्षपदाची कॉलर व चार्टर प्रदान करून पदभार सुपूर्द केला. विश्वास दलाल यांनी लीना पाटील यांना मानद सचिवपदाची सूत्रे दिली. तसेच निखिल सोनवणे व संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते अनुक्रमे गौरव महाले यांना कोषाध्यक्ष आणि चंद्रशेखर साखरे यांना सहसचिवपदाची जबाबदारी प्रदान करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी प्रांतपाल रोटे. राजीव शर्मा यांनी रोटरीची चार मूलभूत तत्त्वे प्रत्येक रोटेरियनसाठी आत्मपरीक्षणाची संधी असल्याचे सांगितले. सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि हसतमुख वृत्तीने केलेले कार्य समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणते, असेही त्यांनी नमूद केले. सहप्रांतपाल हरविंदरसिंग थेथी यांनीही मनोगत व्यक्त केले, तर नूतन अध्यक्ष संजय बारी यांनी आगामी वर्षातील विविध समाजोपयोगी उपक्रमांची रूपरेषा मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगिता पाटील व विलास पी. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. नीता जयस्वाल, चेतन टाटिया आणि प्रणय टाटिया यांनी करून दिला. मावळते अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी गतवर्षातील प्रकल्पांचा आढावा सादर केला, तर आभार प्रदर्शन मानद सचिव लीना पाटील यांनी केले.
यावेळी वसंत नागपुरे, क्षितिज पाटील, दिव्येश पटेल, विजय पाटील, विपिन बोरोले, नवीन टाटिया आणि संदेश शिरसागर या नव्या सदस्यांचे रोटरी पिन प्रदान करून क्लबमध्ये स्वागत करण्यात आले.
सोहळ्यात महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला तसेच गरजू विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शक पुस्तकांचे संच मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.
या दिमाखदार पदग्रहण सोहळ्यास चोपडा शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, रोटरी सदस्य, त्यांचे परिवार तसेच अमळनेर व धरणगाव येथील रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments