जर्मनीत आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; स्टुटगार्टमध्ये दिंडी-पालखीचे आयोजन फैजपूरच्या नारखेडे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम; सातासमुद्रापार घुम...
जर्मनीत आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; स्टुटगार्टमध्ये दिंडी-पालखीचे आयोजन
फैजपूरच्या नारखेडे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम; सातासमुद्रापार घुमला विठ्ठल नामाचा गजर
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर : आषाढी वारीचे पावन पर्व आणि वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आता सातासमुद्रापारही पोहोचली आहे. फैजपूर येथील डिंगंबर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ विष्णू नारखेडे यांचे सुपुत्र विक्रांत नरेंद्रभाऊ नारखेडे, सध्या जर्मनीतील स्टुटगार्ट (Stuttgart) शहरात वास्तव्यास असून, त्यांनी तेथील भारतीय भाविकांना एकत्र आणत आषाढी वारीनिमित्त भव्य दिंडी-पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांची पालखी सजवून स्टुटगार्ट शहरात सप्ताहभर दिंडी काढण्यात येत आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी विठ्ठल नामजप, हरिपाठ, भजन-कीर्तन तसेच सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात येत आहे.
याशिवाय, तेथील भारतीय तरुण, विद्यार्थी आणि भाविकांना एकत्र करून वारकरी संप्रदाय, आषाढी वारीचे महत्त्व, पंढरपूरचे धार्मिक महात्म्य आणि भारतीय संस्कृती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान अन्नदानाचाही उपक्रम राबविण्यात येत असून, भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची ओळख परदेशात जपण्याचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमामुळे सातासमुद्रापार वारकरी संप्रदायाचे विचार आणि संत परंपरेचा संदेश पोहोचत असल्याने धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. विक्रांत नारखेडे यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रज्ञा नारखेडे तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या अनिवासी भारतीय भाविकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या उपक्रमाबद्दल डिंगंबर महाराज मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे, दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते, गायन गंधर्व पंढरीनाथ आरु, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, मानद सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोळे, मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे, मुक्ताई मंदिर अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, विश्वस्त शरदभाऊ महाजन, धनंजय चौधरी, अनिल नारखेडे, भास्कर नारखेडे, सुनील नारखेडे आणि किरण चौधरी यांनी विक्रांत नारखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. फैजपूरचा नारखेडे परिवार सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने योगदान देत असून, जर्मनीतील हा उपक्रम भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.

No comments