adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा महासोहळा: 'गुरु पौर्णिमा' भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणजे गुरुपौर्णिमा "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥"

 ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा महासोहळा:  'गुरु पौर्णिमा' भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणजे गुरुपौर्णिमा  "गुरुर्ब्रह्मा गुरुर...

 ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा महासोहळा:  'गुरु पौर्णिमा'

भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणजे गुरुपौर्णिमा 

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। 

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥" 

भारतीय संस्कृतीमध्ये गुरू म्हणजे केवळ शिक्षक नसून,थेट ईश्वरी प्रारूप मानले गेले आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र सण म्हणजेच 'गुरु पौर्णिमा'. आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो मानवी मूल्ये, संस्कृती आणि गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा उत्सव आहे. यंदाही या उत्सवा निमित्ताने देशभरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ऋषी महर्षी वेदव्यास आणि 'व्यास पौर्णिमा':- या पौर्णिमेला 'व्यास पौर्णिमा' असेही म्हटले जाते. सनातन संस्कृतीतील आद्यगुरु, महाभारताचे रचयिता, चार वेदांचे वर्गीकरण करणारे आणि अठरा पुराणांचे लेखन करणारे थोर ऋषी महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. महर्षी व्यासांनी मानवाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा अथांग साठा ग्रंथांच्या रूपात उपलब्ध करून दिला. त्यांच्या याच अलौकिक कार्यामुळे त्यांना समस्त मानवजातीचे जगद्गुरु मानले जाते. या दिवशी व्यासांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आजही अखंड सुरू आहे.

ऐतिहासिक आणि बहुसांस्कृतिक महत्त्व:-

 गुरु पौर्णिमेचे महत्त्व केवळ एकाच धर्मापुरते मर्यादित नसून ते भारतीय उपखंडातील विविध संस्कृतींमध्ये खोलवर रुजलेले आहे.

हिंदू धर्मात या दिवशी गुरुपूजन करून अध्यात्मिक साधनेत प्रगती करण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद घेतले जातात.

बौद्ध धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र आहे. भौतिक सुखाचा त्याग करून तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या पहिल्या पाच शिष्यांना (पंचवर्गीय भिक्षूंना) याच दिवशी पहिला उपदेश दिला होता, ज्याला 'धम्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते.

जैन धर्मात जैन परंपरेनुसार, चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी आपल्या अध्यात्मिक प्रवासात याच दिवशी आपले पहिले शिष्य 'इंद्रभूती गौतम' यांना दीक्षा दिली होती. त्यामुळे जैन धर्मात या दिवसाला 'गुरु एकादशी' किंवा गुरु पर्व म्हणून महत्त्व आहे.

बदलते युग आणि गुरु-शिष्य परंपरेचे नवे रूप:-

प्राचीन काळात विद्यार्थी गुरुगृही म्हणजे आश्रमात राहून शिक्षण घेत असत. तिथे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शस्त्रविद्या, शास्त्रविद्या आणि जीवन जगण्याचे संस्कार दिले जात. आज काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे आणि शिक्षणाचे स्वरूप 'डिजिटल' झाले आहे. इंटरनेट आणि एआय (AI) च्या युगात माहिती सहज उपलब्ध आहे, परंतु 'माहिती' आणि 'ज्ञान' यात मोठा फरक असतो.माहिती इंटरनेटवर मिळू शकते, पण त्या माहितीचा वापर विवेकाने कसा करावा, हे संस्कार फक्त गुरुच देऊ शकतात. संकटसमयी शिष्याला मानसिक बळ देणे, त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्याला एक संवेदनशील माणूस बनवणे हे कार्य आजही एक जिवंत गुरुच करू शकतो. म्हणूनच, शाळा-कॉलेजात शिक्षक, क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, कला क्षेत्रातील मार्गदर्शक आणि अध्यात्मिक गुरु यांचे स्थान आजही अढळ आहे.

पहिली गुरु 'आई' आणि कुटुंबाचे स्थान:- आपल्या जीवनातील सर्वात पहिली गुरु ही आपली 'आई' असते, जी आपल्याला जगायला आणि बोलायला शिकवते. त्यानंतर 'वडील' जे आपल्याला बोट धरून जगाचा सामना करायला शिकवतात. या विशेष दिवशी आपल्या आई-वडिलांना आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेणे, हा देखील गुरु पौर्णिमेचा एक मुख्य भाग मानला जातो.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी देशभरातील प्रमुख अध्यात्मिक केंद्रांवर, जसे की शिर्डी (साईबाबा मंदिर), शेगाव (गजानन महाराज संस्थान), आळंदी (ज्ञानेश्वर माऊली समाधी), आणि वेगवेगळ्या आश्रमांमध्ये हजारो-लाखो भाविकांची गर्दी होते.सकाळी गुरूंचे पाद्यपूजन, अभिषेक आणि आरती केली जाते.ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि भजनांचे आयोजन केले जाते.जे शिष्य आपल्या गुरूंच्या जवळ जाऊ शकत नाहीत, ते फोन, व्हिडिओ कॉल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरभाव व्यक्त करतात.गुरुचे महत्त्व सांगताना संत कबीर म्हणतात:

"सब धरती कागद करूं,

 लेखनी सब वनराय।

 सात समुद्र की मसि करूं, 

गुरु गुन लिखा न जाय॥"

म्हणजेच, जर पूर्ण पृथ्वीला कागद बनवले, सर्व जंगलांतील लाकडांच्या लेखण्या केल्या आणि सात समुद्रांच्या पाश्याला शाई बनवले, तरीही गुरूंच्या गुणांचे आणि उपकारांचे वर्णन करणे अशक्य आहे.थोडक्यात सांगायचे तर...गुरु पौर्णिमा हा केवळ एका दिवसाचा सण नाही, तर ती आयुष्यभर जपायची कृतज्ञतेची भावना आहे. गुरूने दाखवलेल्या सन्मार्गावर चालणे, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करणे आणि एक जबाबदार, सुसंस्कारी नागरिक बनणे हीच गुरूंची खरी 'गुरुदक्षिणा' ठरेल. सर्व वाचकांना गुरु पौर्णिमेच्या मंगलमयी शुभेच्छा....!!! 


 संकलन:-

श्री संजय ठाकुर सर

जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर

No comments