बुलडाणा जिल्ह्यातील सेतू कार्यालय केंद्र मार्फत प्रस्ताव नाकारण्या विरोधात गणेश इंगळे यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन अमोल बावस्कार ब...
बुलडाणा जिल्ह्यातील सेतू कार्यालय केंद्र मार्फत प्रस्ताव नाकारण्या विरोधात गणेश इंगळे यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलडाणा : तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रांमार्फत अनुसूचित जमाती (कोळी महादेव) समाजाच्या नागरिकांचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे प्रस्ताव १९५० पूर्वीच्या पुराव्यांचा दाखला नसल्याचे कारण देत स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश पांडुरंग इंगळे यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जात पडताळणी समिती (Scrutiny Committee) हीच पुराव्यांची तपासणी करून अंतिम निर्णय घेणारी सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे सेवा केंद्रांनी स्वतःहून प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देणे हे कायद्याच्या व न्यायालयीन आदेशांच्या विरोधात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.यामुळे अनेक विद्यार्थी, नागरिक व समाजबांधवांचे शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाज खोळंबत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाद्वारेजिल्हाधिकाऱ्यांना पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:सर्व महा-ई-सेवा केंद्रांना जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव कोणतीही अडचण न आणता स्वीकारण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत.प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देणाऱ्या संबंधित सेवा केंद्र चालकांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा कोळी महादेव समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात गणेश इंगळे, गंगाधर तायडे, विजय इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

No comments