हरित यज्ञ अभियानाला धरणगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० वृक्ष लागवडीचा संकल्प विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव...
हरित यज्ञ अभियानाला धरणगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० वृक्ष लागवडीचा संकल्प
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : पर्यावरण संवर्धन, वाढते तापमान, घटते प्राणवायूचे प्रमाण आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीजधाम) यांच्या प्रेरणेने देशभर राबविण्यात येणाऱ्या 'हरित यज्ञ' वृक्षारोपण अभियानाला धरणगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. "वृक्ष ही जीवन, वृक्ष हाच धर्म" हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत धरणगाव, पाळधी, धानोरे, बांभोरी, गंगापुरी आदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानांतर्गत शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ, नगरसेवक परमेश्वर महाजन, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर महाजन, तालुकाप्रमुख प्रमोद बयस तसेच गुरुबंधू यांच्या हस्ते शहरातील बालाजी नगर व विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी तालुकाप्रमुख प्रमोद बयस यांनी अभियानामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणे, पर्यावरणीय समतोल राखणे आणि भावी पिढ्यांना हिरवागार वारसा देणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आवाहनानुसार देशभरातील लाखो भक्त आणि स्वयंसेवक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करतात. फक्त वृक्ष लावणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, प्रत्येक वृक्षाचे स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करणे हीच या 'हरित यज्ञ'ची खरी संकल्पना असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी धरणगाव शहर व तालुक्यात आतापर्यंत १०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून, पुढील पाच दिवसांत आणखी १०० वृक्षांची लागवड करून किमान २०० वृक्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी तालुका प्रमुख प्रमोद बयस यांनी दिली. या प्रसंगी शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ, भाजप नेते ॲड. संजय महाजन नगरसेवक परमेश्वर महाजन, पवन महाजन, ज्ञानेश्वर महाजन, ॲड.हर्षल चौहान, तालुकाप्रमुख प्रमोद बयस, शहरप्रमुख अरुण पाटील, सचिव रामकृष्ण माळी, मुन्ना मराठे, कॅम्प प्रमुख खुशाल भावसार, अमोल चौधरी, संजीवनी प्रमुख राजेंद्र अवसरमोल, वीरसिंह बयस यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुबंधू उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण ही फक्त शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, हा संदेश देणारे हे अभियान धरणगाव तालुक्यात जनजागृतीसोबतच हरित भविष्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

No comments