चोपडा वनपरिक्षेत्राचा स्तुत्य उपक्रम: जि.प.शाळा उत्तमनगर येथे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गा...
चोपडा वनपरिक्षेत्राचा स्तुत्य उपक्रम: जि.प.शाळा उत्तमनगर येथे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम साधत चोपडा प्रादेशिक वनपरिक्षेत्राच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, उत्तमनगर येथे शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे चोपडा वनक्षेत्रातील कर्मचारी यांच्या वतीने यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वनक्षेत्रपाल मा.श्री.बी.डी.कुवर साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर मा. श्री.बी.डी.कुवर साहेब यांच्या शुभहस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य हातात मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते. साहित्य वाटपानंतर शाळा परिसरात मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपांची लागवड करून हरित संदेश देण्यात आला.
यावेळी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल बी. डी. कुवर साहेब यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत पटवून दिले. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून शिक्षणासोबतच त्यांच्यात निसर्गाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या प्रदूषणाच्या काळात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अत्यंत गरजेचे बनले असून आज लावलेले प्रत्येक रोप उद्याचा ऑक्सिजनचा मोठा स्त्रोत बनणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या कार्यक्रमास चोपडा वनपरिक्षेत्रातील वनपाल श्री.एस.पी.नागणे व श्री.आर.एस.मोरे, वनरक्षक श्री.रोहित पावरा,श्री.जनार्दन गुट्टे,श्री.अमोल पाटील,श्री.शुभम पाटील,श्रीमती सोनाली बारेला,जयश्री धनगर,पुजा बारेला,पिंकी बारेला,नेहा बारेला,वाहन चालक-श्री.गोविंदा चौधरी तसेच वनसेवक श्री.विक्की राजपुत व श्री.रवींद्र भिल कार्यक्रमांसाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प.शाळा उत्तमनगर येथील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वनविभागाने सामाजिक उत्तरदायित्व जपून विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेल्या या कौतुकाच्या थापेमुळे आणि पर्यावरण संरक्षणाचा दिलेला संदेश यामुळे संपूर्ण परिसरातून या उपक्रमाचे वनविभागाचे जोरदार कौतुक होत आहे.


No comments