भर पावसात फैजपूरात संविधान बचावाचा एल्गार; पाच ते सहा हजार नागरिकांचा महासंघर्ष मोर्चात सहभाग इदू पिंजारी फैजपूर फैजपुर:- अनुसूचित जाती ...
भर पावसात फैजपूरात संविधान बचावाचा एल्गार; पाच ते सहा हजार नागरिकांचा महासंघर्ष मोर्चात सहभाग
इदू पिंजारी फैजपूर
फैजपुर:- अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात फैजपूर येथे आयोजित करण्यात आलेला संविधान बचाव महासंघर्ष मोर्चा गुरुवारी भर पावसातही उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि निर्धारपूर्ण वातावरणात पार पडला. मुसळधार पावसाची तमा न बाळगता रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदविला असून, महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.
मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर "जय भीम... जय संविधान...", "आंबेडकर... आंबेडकर..." तसेच "फुले-शाहू-आंबेडकर..." अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. भर पावसातही नागरिकांनी शिस्तबद्धपणे विभागीय कार्यालयाकडे कूच केली.
या मोर्चाचे नेतृत्व अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, रावेर–यावल तालुकाचे मुख्य समन्वयक अनोमदर्शी तायडे यांनी केले. यावेळी जगनभाऊ सोनवणे (भुसावळ) आणि सामाजिक कार्यकर्ते शमीभा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी मुख्य समन्वयक अनोमदर्शी तायडे म्हणाले, "आमचा लढा कोणत्याही जातीच्या विरोधात नसून अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्याय टिकवून ठेवण्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत. मातंग समाजाव्यतिरिक्त इतर ५७ जातींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठ्या भावाच्या भूमिकेतून हा लढा उभारला आहे."
ते पुढे म्हणाले की, "हा संघर्ष कोणत्याही समाजाविरोधात नसून विषमता वाढविणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेविरोधात आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या समानता, सामाजिक न्याय आणि बंधुत्वाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे."
मोर्चा विभागीय कार्यालयात पोहोचल्यानंतर समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना सादर करण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारले.
मोर्चादरम्यान पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे भर पावसातही आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
या महासंघर्ष मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, विविध सामाजिक संघटना, महिला, युवक, कार्यकर्ते तसेच रावेर–यावल तालुक्यातील नागरिकांनी मोठे सहकार्य केले. पावसाची पर्वा न करता हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावल्याने फैजपूरच्या भूमीतून सामाजिक न्याय आणि संविधान संरक्षणाचा बुलंद आवाज उमटल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments