मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशांनंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाक...
मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशांनंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही उत्तर; सुरक्षात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची अपेक्षा
विकास पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाळधी खुर्द येथील पोखरी चौफुली (गायळ माता मंदिर परिसर) येथे सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांनंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी सादर केलेल्या निवेदनास अधिकृत उत्तर देण्यात आले असून, प्रकरण संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
२६ जून रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता पोखरी चौफुलीवर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात स्प्लेंडर दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक नीलकंठ पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाचे हाड मोडले. या घटनेनंतर चौफुलीवरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
राष्ट्रीय महामार्गावरून अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडणारे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच आकाश बाम परिसरातील शेकडो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांना गुगल मॅप लोकेशनसह अधिकृत ई-मेलद्वारे निवेदन पाठवून पोखरी चौफुलीवर गतिरोधक, रिफ्लेक्टर आणि इशारा फलक बसविण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री सचिवालयाने या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही निवेदनाची नोंद घेऊन संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविण्यात आल्याचे अधिकृत उत्तर देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे पोखरी चौफुलीवरील सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून गतिरोधक, रिफ्लेक्टर व आवश्यक सूचना फलक तातडीने बसवावेत. या कामाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे," असे सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी सांगितले.

No comments