दादापीर नगरमधील महिला व नागरिकांचा नगर पालिकेवर धडक मोर्चा! " निलंग्यात प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर संतापाचा लाव्हा फुटला. ला...
दादापीर नगरमधील महिला व नागरिकांचा नगर पालिकेवर धडक मोर्चा!
" निलंग्यात प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर संतापाचा लाव्हा फुटला.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
"आमच्या हक्काचा रस्ता कुठे आहे? आमच्या लेकरांना चिखलातून शाळेत पाठवायचे का? कर भरूनही आमच्या नशिबी फक्त नरकयातनाच का?" असा आर्त आणि संतप्त सवाल करत आज लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरा अंतर्गत येणाऱ्या दादापीर नगर परिसरातील शेकडो नागरिक, माता-भगिनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी थेट दादापीर परिसरापासून नगर पालिकेपर्यंत भव्य व धडक मोर्चा काढला. अंगावर काटा आणणाऱ्या चिखलातून आणि सांडपाण्याच्या डबक्यातून वाट काढत निघालेल्या या विशाल जनक्षोभाने नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडक देत प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि अक्षम्य दुर्लक्षाबद्दल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीकेची तोफ डागली.
आज एकविसाव्या शतकात आपण प्रगतीच्या आणि विकासाच्या कितीही वल्गना करत असलो, तरी निलंगा नगरपालिकेच्या दावेदारांच्या नाकाखाली असलेल्या दादापीर नगरमधील वास्तव मात्र अत्यंत विदारक आणि मानवतेला कलंक लावणारे आहे. परिसरातील रस्ते म्हणजे केवळ खड्डे आणि गुडघ्यापर्यंत साचलेला चिखल बनले आहेत. पावसाळ्याचे दिवस असोत वा शहरात चाललेली अस्ताव्यस्त ड्रेनेजची कामे असोत, या दोन्हीचा सर्वाधिक आणि जीवघेणा फटका या गरीब वस्तीला बसला आहे.
सकाळी पाठीवर स्कूल बॅग घेऊन जाणारी लहान बाळगोपाळ मुले, वृद्ध आई-वडील आणि हातावर पोट असणारे कामगार याच जीवघेण्या चिखलातून पाय घसरून पडत आहेत. दुचाकी गाड्या जागीच रुतत आहेत. सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने संपूर्ण परिसरात आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही, जनतेच्या करावर मलिदा खाणारे अधिकारी आणि कुंभकर्णी झोपेत असलेली नगर पालिकेची यंत्रणा अजून किती जणांचे जीव जाण्याची वाट बघत आहे? असा संतप्त सवाल मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केला.
"आम्ही या देशाचे नागरिक नाही का?" प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती
वारंवार निवेदने देऊन, चप्पल झिजवूनही जेव्हा प्रशासनाला जाग आली नाही, तेव्हा नाइलाजास्तव दादापीर नगरवासीयांना रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याची वेळ आली. "तुम्ही निवडणुकीच्या वेळी मते मागताना याच जनतेचे उंबरठे झिजवता, मग आज आमच्या लेकरांच्या वाट्याला हा चिखल आणि घाण का आली?" अशी तोफ डागत महिलांनी प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला.
शोषित आणि पीडित दादापीर नगरवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उरत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर जिल्हा मुख्य कार्यकारी युवती अध्यक्ष सौ. विशाखा रोहित हतागळे यांनी प्रशासनाला थेट आणि अंतिम इशारा दिला आहे.व खालील मागण्या केल्या आहेत.त्या प्रामुख्याने
दादापीर नगर परिसरातील रस्त्यांवर तात्काळ मुरुम टाकण्यात यावा आणि पक्के रस्ते व नालीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे.रस्त्यावरील लाईटची व्यवस्था करण्यात यावी सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे. यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
याबाबत प्रशासनाने जर आताही गांभीर्य दाखवले नाही, तर याहूनही अधिक तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि नगर परिषदेच्या कार्यालयाला कुलूप लावले जाईल, असा गर्भित व तीव्र इशारा यावेळी देण्यात आला.
या मोर्चात राधा कर्मवीर कुशल, सोनाली तळेकर, पंदिनी सोनटक्के, छाया विहिरे, मन्नाबी शेख, तनुजा पवार, आशिया खुरेशी यांच्यासह दादापीर नगर परिसरातील शेकडो नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या धडक मोर्चानंतर आतातरी प्रशासनाचे डोळे उघडणार का आणि दादापीर नगरच्या नशिबी आलेला हा चिखल पुसला जाणार का, याकडे संपूर्ण निलंगा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments