adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खान्देशचा स्वर्ग ठरलेला चौगावचा ऐतिहासिक गवळी राज्यांचा किल्ला; राज्य संरक्षित स्मारक व पर्यटनाचा 'ब' दर्जा देण्याची मागणी

खान्देशचा स्वर्ग ठरलेला चौगावचा ऐतिहासिक गवळी राज्यांचा किल्ला; राज्य संरक्षित स्मारक व पर्यटनाचा 'ब' दर्जा देण्याची मागणी दोन हजार ...

खान्देशचा स्वर्ग ठरलेला चौगावचा ऐतिहासिक गवळी राज्यांचा किल्ला; राज्य संरक्षित स्मारक व पर्यटनाचा 'ब' दर्जा देण्याची मागणी

दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहनकालीन लेण्या, बाराव्या शतकातील गवळी राज्यांचा किल्ला आणि निसर्गरम्य परिसरामुळे चौगाव पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता 


विश्राम तेले (चौगाव) 

 संपादक : हेमकांत गायकवाड

चोपडा तालुक्यातील चौगाव येथील ऐतिहासिक गवळी राज्यांचा किल्ला हा खान्देशातील अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारसा मानला जातो. बाराव्या शतकात उत्तर भारताकडे जाणाऱ्या भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी अहिर राजे जवोजी गवळी व गोवाजी गवळी यांच्या कारकिर्दीत सुमारे २७ एकर क्षेत्रावर या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. सन १८१८ आणि १८८० च्या ब्रिटिशकालीन गॅझेटिअरमध्ये या किल्ल्याच्या बांधकामासाठी त्या काळात तब्बल दोन लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आढळते.

या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेल्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहनकालीन लेण्या. किल्ल्यावर पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख असे दोन प्रवेशद्वार, मजबूत तटबंदी, अनेक बुरुज, भुयारी मार्ग तसेच सुमारे दहा गुंठे क्षेत्रात उभारलेला गवळी वाडा आजही सुस्थितीत आहे. वाड्यातील खोल्या, देवळ्या आणि विटांवरील नक्षीकाम तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष देतात. 


किल्ल्यालगत असलेला सप्ततलावांचा समूहही विशेष आकर्षणाचा विषय आहे. अनेक वर्षे गाळाने भरून गेलेल्या या तलावांपैकी चार तलाव विविध दुर्गसंवर्धन संस्थांच्या पुढाकाराने स्वच्छ करण्यात आले आहेत. राजा शिवछत्रपती परिवार, ऐतिहासिक वारसा संवर्धन व कृती समिती, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, टीम खान्देश एक्सप्लोरर आणि चौगाव किल्ला संवर्धन समिती यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या तलावांमध्ये आज बारमाही पाणी असून त्यामध्ये फुलणारी कमळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

किल्ल्याच्या परिसरात भग्नावस्थेतील मंदिर, वीरगळ, समाधीस्थळे तसेच अलीकडेच सापडलेले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. या अवशेषांवरून किल्ल्याच्या पायथ्याशीही प्राचीन मंदिर अस्तित्वात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच येथे सैनिकांचा दीर्घकाळ वास्तव्यास असल्याचेही ऐतिहासिक पुरावे मिळत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. सन १९७८ मध्ये या किल्ल्यावर सहा फूट लांबीच्या तोफा सापडल्या असून सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या चोपडा तहसील कार्यालयात जतन करण्यात आल्या आहेत.

चौगाव किल्ल्याची नोंद ब्रिटिशकालीन गॅझेटिअर तसेच महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा गॅझेटमध्ये 'गवळी राज्यांचा किल्ला' म्हणून करण्यात आली आहे. पुरातत्त्व संशोधक भुजुंगराव बोबडे, चौगाव वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले, इतिहास अभ्यासक डॉ. गोपाल पाटील आणि प्रा. पंकज शिंदे यांनी किल्ल्यावरील सातवाहनकालीन लेण्या व उत्तर मराठा राजवटीतील कोनशिलेचा शोध घेऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल १४ मार्च २०२१ रोजी तत्कालीन पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्री. गर्गे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सादर केला होता.


इतिहासदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असूनही चौगाव किल्ल्याची अद्याप पुरातत्त्व विभागाकडे अधिकृत नोंद झालेली नाही. वन विभाग आणि पुरातत्त्व विभाग यांच्यातील प्रशासकीय अडचणींमुळे या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जाही मिळालेला नाही. साल्हेर आणि मुल्हेर किल्ल्यांप्रमाणे वन विभागाच्या हद्दीत असूनही चौगाव किल्ल्यालाही राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

किल्ल्यालगत असलेल्या त्रिवेणी महादेव मंदिराला सन २०१० पासून तीर्थक्षेत्राचा 'क' दर्जा प्राप्त झाला असून दरवर्षी सुमारे एक ते सव्वा लाख भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः पावसाळा, श्रावण महिना, नवरात्रोत्सव, दिवाळी, हरतालिका आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी गर्दी होत असते. जिल्ह्यातील सर्वात उंच व आकर्षक धबधबा, त्रिवेणी महादेव मंदिर, सातवाहनकालीन लेण्या आणि ऐतिहासिक किल्ला या सर्वांचा एकत्रित विकास झाल्यास चौगाव हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते.

मात्र आजही मूलभूत पर्यटन सुविधांचा अभाव जाणवत असून राज्य पर्यटन विभागाकडून 'ब' दर्जा मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊन पर्यटन विकासास चालना मिळेल आणि आदिवासी बहुल परिसरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. त्यामुळे चौगाव किल्ल्याला तातडीने राज्य संरक्षित स्मारक घोषित करून राज्य पर्यटनाचा 'ब' दर्जा देण्यात यावा, अशी मागणी चोपडा, जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून जोर धरत आहे. 


No comments