"शासनाने शिक्षकांच्या भवितव्याशी खेळ थांबवावा; अन्यायकारक संच मान्यता तात्काळ रद्द करा!" –प्रा.रुपालीताई बोरुडे अहिल्यानगर जिल्हा...
"शासनाने शिक्षकांच्या भवितव्याशी खेळ थांबवावा; अन्यायकारक संच मान्यता तात्काळ रद्द करा!" –प्रा.रुपालीताई बोरुडे
अहिल्यानगर जिल्हा महिला अध्यक्षा, शिक्षक भारती यांचा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना इशारा; प्रचलित पद्धतीनेच ऑफलाइन संच मान्यता करण्याची ठाम मागणी
प्रतिनिधी जावेद शेख / राहूरी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या सन २०२५-२६ च्या संच मान्यता प्रक्रियेत गंभीर संभ्रम निर्माण झाला असून हजारो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. कोणताही नवीन शासन निर्णय किंवा स्पष्ट परिपत्रक नसताना नियमांचा चुकीचा अर्थ लावून संच मान्यता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिक्षक भारतीच्या अहिल्यानगर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. रुपालीताई बोरुडे यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या, "कला, विज्ञान आणि वाणिज्य अशा विविध शाखांमध्ये एकाच शिक्षकाचा कार्यभार विभागलेला असतो. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनाचा विचार न करता संगणकीय किंवा बदललेल्या निकषांनुसार संच मान्यता केल्यास अनेक शिक्षक विनाकारण अतिरिक्त ठरतील. त्यातून 'नो वर्क, नो पे'सारखी गंभीर परिस्थिती निर्माण होईल. हा शिक्षकांवरच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरही अन्याय आहे."
सौ. बोरुडे यांनी स्पष्ट इशारा दिला की, प्रचलित पद्धतीला डावलून, कोणत्याही वैधानिक आदेशाशिवाय नवीन अर्थ लावून संच मान्यता करणे ही प्रशासनाची गंभीर चूक ठरेल. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संच मान्यता पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने, प्रत्यक्ष अध्यापन कार्यभार, तीनही शाखांचा एकत्रित तासभार आणि विषयनिहाय गरज लक्षात घेऊन करावी.
शिक्षक भारतीने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तातडीने निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यव्यापी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
"शिक्षकांचे अस्तित्व सुरक्षित राहिले तरच शिक्षण व्यवस्था सक्षम राहील. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल," असा ठाम इशारा सौ. रुपालीताई बोरुडे यांनी दिला.या मागणीसाठी आमदार कपील पाटील,राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे , कार्याध्यक्ष सुभाष मोरे, विनाअनुदान कृती समिती राज्याध्यक्ष जयवंत भाबड, सचिव सुनील गाडगे, विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, महिला अध्यक्ष रूपालीताई बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे, समन्वयक शरद पवार, प्रवीण काळे, सहसचिव राहुल कानवडे, तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात, संपत वाळके, दिगंबर देसाई, अतुल कोताडे, कल्पना चौधरी, मफीज इनामदार, दीपक फापाळे,गणपत धुमाळ, विजय पांडे, अमोल तळेकर, संतोष नवले, बाबासाहेब तांबे,अकील फकीर, बाबाजी लाळगे, वैभव चोथे, प्रवीण मालुंजकर, श्याम जगताप, महेंद्र लाळगे आदींनी पाठिंबा दिला.
---------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments