चारधाम यात्रा पूर्णता समारंभ हरिद्वार येथे उत्साहात; श्रद्धा, एकता आणि अध्यात्माचा अविस्मरणीय सोहळा जळगाव प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत ग...
चारधाम यात्रा पूर्णता समारंभ हरिद्वार येथे उत्साहात; श्रद्धा, एकता आणि अध्यात्माचा अविस्मरणीय सोहळा
जळगाव प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्ञानेश यात्रा परिवार, जळगाव यांच्या वतीने आयोजित चारधाम यात्रेचा पूर्णता समारंभ हरिद्वार येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र चारधामांची यशस्वी यात्रा पूर्ण केल्यानंतर सर्व ५७ यात्रेकरूंनी या समारंभात सहभागी होत ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. चंद्रकला ताई मराठे या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश यात्रा परिवार, जळगावचे प्रमुख श्री गोरख महाराज उपस्थित होते. व्यासपीठावर मान्यवर, गुरुजन तसेच सर्व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिचयात्मक भाषणात चारधाम यात्रा ही केवळ पर्यटन नसून श्रद्धा, संयम, सेवा, त्याग आणि आत्मचिंतनाची पवित्र साधना असल्याचे सांगण्यात आले. हिमालयातील उंच पर्वतरांगा, कठीण मार्ग, प्रतिकूल हवामान आणि विविध आव्हानांवर मात करत यात्रेकरूंनी श्रद्धेच्या बळावर ही यात्रा पूर्ण केली. या यात्रेत सर्वांनी एकमेकांना दिलेली साथ, प्रेम आणि सहकार्य हेच यात्रेचे खरे वैशिष्ट्य ठरल्याचेही नमूद करण्यात आले.
यात्रेचे यशस्वी आयोजन करणारे श्री गोरख महाराज, मार्गदर्शक गजानन महाराज, वाहनचालक, स्वयंसेवक, वैद्यकीय मदतनीस तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण यात्रा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरल्याचे यात्रेकरूंनी सांगितले.
यावेळी भगवान केदारनाथ, भगवान बद्रीनाथ, माता गंगा आणि माता यमुना यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि सद्बुद्धी लाभावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील चौधरी यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री देवामामा कुलकर्णी यांनी केले. समारोपावेळी सर्व भाविकांना भविष्यातील धार्मिक यात्रांसाठी ज्ञानेश यात्रा परिवार, जळगाव व श्री गोरख महाराज यांच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
"जय बद्रीविशाल... हर हर महादेव... भारत माता की जय!" या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.


No comments