महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ३ वर्षीय चिमुकलीचा वीज लागून दुर्दैवी मृत्यू;नागरिकांमध्ये प्रचंड संताप स्टेशनरोड येथील आनंद नगर मधील घटना ...
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ३ वर्षीय चिमुकलीचा वीज लागून दुर्दैवी मृत्यू;नागरिकांमध्ये प्रचंड संताप स्टेशनरोड येथील आनंद नगर मधील घटना
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- आईच्या कुशीत खेळायच्या आणि बागडण्याच्या वयात एका निष्पाप चिमुकलीचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी अंत झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे.येथील स्टेशन रोड परिसरातील आनंदनगर भागात विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने अवघ्या ३ वर्षांच्या प्रीती गांगुर्डे या चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विजेच्या खांबातून गेल्या काही दिवसांपासून धूर निघत होता याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या,तसेच लेखी अर्जही देण्यात आले होत.परंतु,महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाऊस सुरू असताना चिमुकल्या प्रीतीचा या लोखंडी खांबाला स्पर्श झाला आणि वीज प्रवाहित असल्याने ती जागीच खेचली गेली.या घटनेची माहिती मिळताच भाजपचे नगरसेवक दत्ता गाडळकर,नगरसेविका गीतांजली काळे आणि संकेत गव्हाळे, शिवसेनेचे मा.नगरसेवक संभाजी कदम, सामाजिक कार्यकर्ते नितीन भुसारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली."हा अपघात नसून महावितरणने निष्काळजीपणाने घेतलेला बळी आहे," असा गंभीर आरोप नगरसेवक दत्ताभाऊ गाडळकर यांनी केला आहे.तसेच दोषी अभियंत्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.स्थानिक रहिवाशांनी महावितरणच्या भोंगळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत."महावितरणचा तक्रार निवारण क्रमांक कधीच लागत नाही आणि कर्मचारी कायम उडवाउडवीची उत्तरे देतात," असा संताप नागरिकांनी व्यक्त केला घटनेनंतरही अनेक वेळा फोन केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागे झाले आणि त्यांनी वीज पुरवठा खंडित केला.दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी दिला आहे एका निष्पाप मुलीचा जीव गेल्याने गांगुर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण आनंदनगर परिसर सुन्न झाला आहे.

No comments